मुंबई : १२ वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या मंचावरून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पंचरत्नांपैकी सगळ्यात लहान चिमुरडी म्हणजे मुग्धा वैशंपायन. आता मुग्धा जजच्या रूपात ‘सारेगमप’मध्ये दिसणार आहे. एक तपाच्या या काळामध्ये मुग्धानं बरंच काही आत्मसात केलं आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच गायनातही ती पारंगत झाली आहे. तिच्या सोबत साधलेला हा खास संवाद


१. तुला गायनाची गोडी कशी लागली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सध्या मी पंडीता शुभदा पराडकर यांच्याकडे गाणं शिकतेय. माझ्या घरी म्युझिकल बॅग्राऊंड नाही. बाबा रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जॅाब करतात आणि आई गृहिणी आहे. बाबांच्या बाबांना म्हणजे माझ्या आजोबांना गाणी ऐकायला आवडायचं. त्या काळी रात्री रेडिओवर नाट्य संगीत किंवा क्लासिकल संगीत लागायचं ते आजोबा न चुकता ऐकायचे. बाबांनाही त्याची गोडी लागली. मी लहान असताना बाबाही गाणी लावायचे. त्यामुळे गाणं कानावर पडत गेलं. बाबांना तबला वाजवायला आवडत असल्यानं आम्ही अलिबागला शिफ्ट झाल्यावर त्यांना तबला शिकवायला गुरुजी यायचे. ते हार्मोनियमवर साथ करायचे, तेव्हा मी पूर्ण वेळ तिथेच असायचे. गुरुजी गेल्यावर हार्मोनियमवर हात पुरत नसूनही मी गाण्याचा प्रयत्न करायचे. त्यावेळी बाबांनी माझा गायनाचा कल ओळखला. मग कौटुंबिक कार्यक्रमामध्ये काहीतरी गाणं वगैरे म्हणायचे.


२. तू जेव्हा सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये सहभागी झालीस तो क्षण तुला आठवतोय का?


- चौथी इयत्तेत शिकत असताना सारेगमपच्या ऑडिशन्स सुरू झाल्याचं टीव्हीवर दाखवलं गेलं. माझ्या क्लासटीचर हळदवणेकर यांनी याबाबत बाबांना सांगितलं. आपण मुग्धाला तिथे घेऊन जाऊया असं त्या म्हणाल्या, पण मुग्धा फार छोटी असून, ती गाणं शिकलेली नसल्यानं स्पर्धेत सहभागी होण्याइतकी छान गात नसल्याचं आई-बाबांना वाटत होतं. तिथे मुंबई-पुण्यातील मुलं असल्यानं मुग्धा नक्की एलिमीनेट होणार असं त्यांना वाटत होतं. यासाठी ते टाळत होते, पण क्लासटीचर खूपच मागे लागल्या होत्या. स्वत: मला घेऊन जायला तयार झाल्या. त्यामुळं आई-बाबांपुढे पर्याय नव्हता. मी एलिमिनेट होऊन एका दिवसात परतणार याची आई-बाबांना पक्की खात्री असल्यानं फक्त अंगावरच्या कपड्यांसह मुंबईला गेलो होतो. मुंबईत फायनल राऊंडसाठी मी सिलेक्ट झाले.  


३. तुला मिळालेलं यश तू लहान वयात कसं हॅन्डल केलं?


- मी खूप लहान असताना ‘सारेगमप’मध्ये यश मिळवल्यानं आपण खूप काही मोठं केलंय किंवा आपल्याला खूप प्रसिद्धी मिळतेय याबाबत मला काहीच कळत नव्हतं. माझा पहिला एपिसोड शूट झाल्यानंतर १५ दिवसांनी तो एपिसोड टेलिकास्ट झाला. सर्वांना खूप उत्सुकता होती. माझं गाणं पाहिल्यावर मी बाबांना विचारलं की, अच्छा आपण जे तिथे गेलो होतो ते इथे गाणं दिसण्यासाठी होतं का? इतकं ते निरागस होतं. त्यामुळं मी इतर लहान मुलांप्रमाणेच इनोसन्स होते. मुख्याध्यापकांना माझं खूप कौतुक होतं, पण माझ्यामुळे इतर मुलांना वाईट वाटू नये यासाठी त्यांनी मला सर्वांसारखीच वागणूक दिली. आई-बाबांनीही मला वेगळी वागणूक देऊ नका असं सर्वांना सांगितलं होतं. आपण काहीतरी अचिव्ह केलं आहे असं मला वाटू नये यासाठी खूप हेल्दी वातावरण ठेवण्यात आलं होतं.


४. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वातील टॅलेंटबद्दल काय सांगशील?


- आम्ही टेक्नोसॅव्ही नव्हतो. त्यामुळं एखादा कलाकार स्वत:ला कसा प्रेझेंट करू शकतो याबाबत काही ठाऊक नव्हतं. सारेगमपनंतर जे काही केलं ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे आम्हाला समजत नव्हतं. आताची जनरेशन टेक्नोसॅव्ही आहे. त्यांना स्वत:ला प्रमोट कसं करायचं, कसं प्रेझेंट करायचं हे माहित आहे. हे करताना त्यांचा गाण्यावरचा फोकस कमी होता कामा नये याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. यासाठी त्यांना ग्रूम करण्याचा प्रयत्न करू. त्यांचे ताई-दादा बनून त्यांना समजावू. जज या भूमिकेत असलो, तरी ताई-दादाच्या नजरेतून आम्ही त्यांना जज करणार आहोत ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते.