Saif Ali Khan पाच हजार कोटींचा मालक , पण नाही देवू शकत मुलांना संपत्ती
खान कुटुंबातही संपत्तीवरून वाद; पतौडी संपत्तीचा थेट पाकिस्तानसोबत संबंध
मुंबई : अभिनेता सैफ अली खान पतौडी नवाब आहे. फक्त खासगी आयुष्यात नाही तर सैफ बॉलिवूडचा देखील नवाब आहे. रॉयल कुटुंबातील असल्यामुळे सैफची संपत्ती देखील मोठी आहे. सैफ तब्बल 5 हजार कोटी रूपयांचा मालक आहे. सैफ चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून प्रचंड पैसे कमावतो. एवढंच नाही तर त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता देखील आहे. रिपोर्ट्सनुसार, सैफकडे हरियाणातील पतौडी पॅलेस आणि भोपाळमधील वडिलोपार्जित संपत्तीसह 5000 कोटींची मालमत्ता आहे. पण यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी मोठी संपत्ती असूनही सैफ आपल्या मुलांना ती देऊ शकत नाही.
यामागील कारण म्हणजे सैफची सर्व वडिलोपार्जित मालमत्ता भारत सरकारच्या एनिमी डिस्प्यूट कायद्यांतर्गत येते. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला मालमत्तेवर हक्क सांगता येत नाही. कोणीही याला विरोध करून ही मालमत्ता आपली मालमत्ता मानत असेल, तर त्यांना उच्च न्यायालयात जावे लागेल.
उच्च न्यायालयातही या प्रकरणाचा निकाल लागला नाही, तर ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही या प्रकरणाचा निर्णय लागला नाही तर त्यावर निर्णय देण्याचा अधिकार फक्त देशाच्या राष्ट्रपतींना आहे. दरम्यान सैफ अली खानचे पणजोबा हमीदुल्ला खान ब्रिटिश काळात नवाब होते.
परंतु त्यांनी आपल्या मालमत्तेचे कोणतेही मृत्युपत्र केले नव्हते. त्यामुळे कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सैफच्या आजीचे कुटुंबासोबत या प्रकरणामध्ये काही मतभेद आहेत, ज्याचा संबंध मालमत्तेशी आहे. त्यामुळे सैफ त्याच्या मुलांना संपत्ती वाटू शकत नाही.