#MeToo `सैराट` फेम गायिकेचा `मामा`वर लैंगिक शोषणाचा आरोप
ते वारंवार माझ्या....
मुंबई: तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये आरोप, प्रत्यारोप सुरु असतानाच आता यामध्ये आणखीही काही नावं जोडली जात आहेत. सध्याच्या घडीला #MeToo ही चळवळ भारतीय कलाविश्वात चांगलीच जोर धरु लागली असून, अनेकांनीच अशा काही घटनांना वाटा फोडली आहे, जे पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
बऱ्याच वर्षांपूर्वीच्या लैंगिक शोषणाच्या घटनाही पुन्हा जागवल्या जात असून आता यात एका गायिकेचाही पुढाकार पाहाला मिळत आहे.
'सैराट' या चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे आणि तिच्या इतरही अनेक गीतांमुळे प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या गायिका चिन्मयी श्रीपदा हिने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाच्या काही प्रसंगांविषयी खुलेपणाने भाष्य केलं आहे.
सोशल मीडियाचा आधार घेत तिने अशा काही घटनांना वाचा फोडली आहे, जे पाहता या मुद्द्याचं गांभीर्य पुन्हा विचार करण्यास भाग पाडत आहे.
आठ, नऊ वर्षांची असतेवेळी चिन्मयीसोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केलं होतं.
याविषयी तिने लिहिलं, 'मी झोपलेली असताना कोणीतरी व्यक्ती माझ्या शरीराच्या त्या भागांना स्पर्श करत असल्याचं मला जाणवलं. त्यावेळी माझी आई एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गेली होती. सँथोम कम्युनिकेशन्स या स्टुडिओमध्ये ही घटना घडली होती. ज्यानंतर ते काका वाईट आहेत असं मी आईला सांगितलं होतं.'
तिने आणखी एक प्रसंग सांगितला जेव्हा ती जवळपास १०, ११ वर्षांची होती. ज्या व्यक्तीकडे ती आदराच्या नजरेने पाहायची तेच पूर्ण कॉन्सर्टदरम्यान, तिच्या पायांवरून वारंवार हात फिरवत होते. त्या व्यक्तीचा उल्लेख तिने ‘respectable mama’ असा केला आहे.
पुढे जाऊन ज्या ठिकाणी वयस्कर व्यक्ती आहेत, तेथे लहान मुलं सुरक्षित नाहीत हे चिन्मयीच्या लक्षात आलं. कोणत्याही महिलेला ज्यावेळी पुरुष तिला आलिंगन देतो तेव्हा कोण तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करत आहे हे लगेचच लक्षात येतं, असं म्हणत सर्वच पुरुष एकसारखे नसतात हा मुद्दा तिने इथे मांडला.