Salim Khan on Second Marriage: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) खासगी आयुष्य आता लपून राहिलेलं नाही. सलमान आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला दोन आई आहेत. सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांनी विवाहित असतानाही अभिनेत्री हेलन (Helen) यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. विशेष म्हणजे सलीम खान एकाच छताखाली आपल्या दोन्ही पत्नी आणि मुलांसह राहतात. सलमान खानदेखील हेलन यांच्यावर सख्ख्या आईइतकंच प्रेम करतो. मात्र सलीम खान यांनी सगळं काही सुरळीत असतानाही दुसरं लग्न का केलं असावं?  हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. दरम्यान, नुकतंच सलीम खान यांनी स्वत: एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलीम खान मुलगा अरबाज खानचा (Arbaz Khan) नवा कार्यक्रम 'द इन्विसिबल विद अरबाज खान'मध्ये (The Invincibles with Arbaz Khan) पोहोचले होते. या कार्यक्रमाचा टीझर शेअर करण्यात आला असून सलीम खान पहिले पाहुणे असणार आहेत. यावेळी त्यांनी आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर खुलासा केला आहे. 


सलीम खान यांनी सांगितलं दुसऱ्या लग्नाचं कारण


सलीम खान यांनी आपल्या मुलाला दिलेल्या मुलाखतीत दुसरं लग्न करण्याचं कारण सांगितलं. सलीम खान यांचं पहिलं लग्न सुशीला चरक उर्फ सलमा (Salma Khan) यांच्याशी झालं होतं. 18 नोव्हेंबर 1964 ला दोघे विवाहबंधनात अडकले होते. पण विवाहित असतानाही सलीम खान यांचे हेलन यांच्यासह प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर 1981 मध्ये सलीम खान यांनी हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. यामागील कारणाचा त्यांनी खुलासा केला आहे. 


हेलन यांच्याशी विवाह करण्याबद्दल सलीम खान काय बोलले?


अरबाजने हेलन यांच्याबाबत विचारलं असता सलीम खान म्हणाले "आम्ही दोघेही तरुण होतो. माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मी त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला होता. तो एक भावनिक अपघात होता आणि तो कोणासोबतही होऊ शकतो". यावर अरबाजने व्यक्त होत आपला अनुभव शेअर केला. तो म्हणाला की "यावरुन मी कदाचित तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता होती. अनेक गोष्टी समजण्यासाठी योग्य वेळ मोलाची असते".



1980 च्या दशकात बॉलिवूडमध्ये सलीम खान आणि हेलन यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. बॉलिवूडमध्येही त्याचे किस्से सांगितले जात होते. हेलन यांच्यासह असणारं आपलं नातं अनेकांनी स्विकारलं नव्हतं असा खुलासाही यावेळी त्यांनी केला. 


सलीम खान आणि हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतलं आहे. तर पहिल्या लग्नापासून त्यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलविरा अशी चार मुलं आहेत. 


सलमा यांना लपून भेटायचे सलीम खान


या कार्यक्रमात सलीम खान यांनी सलमा खान यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. आम्ही लपून भेटायचो. मी त्यांच्या आई-वडिलांना भेटायला गेलो तेव्हा सगळे माझ्याकडे एकटक पाहत होते. जणू काही एखादा प्राणी आला आहे असं सगळे पाहत होते असं सलीम खान यांनी सांगितलं. 


अरबाज खानने सलीम खान यांना अनेक प्रश्न विचारले असून टीझरमध्ये त्याची झलक दिसत आहे. या कार्यक्रमात जावेद अख्तर, शत्रुघ्न सिन्हा, वहीदा रेहमान, हेलन असे अनेक दिग्गज अभिनेते सहभागी होणार आहेत.