अभिनेता सलमान खानचा ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कारने गौरव
बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान याला लंडनमधील ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कारने गौरविण्यात आलं आहे.
लंडन : बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान याला लंडनमधील ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कारने गौरविण्यात आलं आहे.
शुक्रवारी ब्रिटनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार किथ वाज यांच्याहस्ते अभिनेता सलमान खान याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर वाज यांनी म्हटलं की, "ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कार अशा खास व्यक्तींना दिला जातो, ज्यांनी जगभरात विविधतेसाठी उल्लेखनीय कार्य केलं असेल. अभिनेता सलमान खानही त्यापैकी एक आहे."
वाज यांनी सलमान खानचं कौतुक करताना म्हटलं की, सलमान केवळ भारतीय किंवा वर्ल्ड सिनेमाचे महान कलाकार नाहीयेत तर, त्यांनी समाजासाठी खुप काही काम केलं आहे.
तर, सलमान खानने म्हटलं की, "तुम्ही हा पुरस्कार देऊन माझा गौरव केला त्याबद्दल तुमचे खुप-खुप धन्यवाद. अशा प्रकारे पुरस्कारांनी माझा गौरव होईल असा माझ्या वडिलांनीही कधी विचार केला नसेल. पण, तुम्ही माझा सन्मान करत पुरस्कार प्रदान केला."
अभिनेता सलमान खान सध्या लंडनमध्ये आपल्या एका कार्यक्रमासाठी गेला आहे. हा कार्यक्रम शनिवारी बर्मिघम आणि रविवारी लंडनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडिस, अभिनेता प्रभुदेवा, सूरजा पांचोली उपस्थित राहणार आहेत.