रोहित शेट्टीच्या सिनेमात झळकणार सलमान खान
सलमान-रोहित ही जोडी कलाविश्वात कल्ला करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई: बॉलिवूडमध्ये अव्वल स्थानी असलेल्या दबंग सलमान खानच्या सिनेमांच्या प्रतिक्षेत त्याचे चाहते नेहमीच असतात. त्याच्या आगळ्या-वेगळ्या कृतीतून तो चाहत्यांचे मनोरंजन करतो. सध्या त्याच्या 'भारत' सिनेमामाच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र आहे. सिनेमाचे शूटिंग सध्या गोव्यात होत असून सलमान खान लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सिनेमात झळकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सिम्बा'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' सिनेमात अभिनेता रणवीर सिंगने दमदार भूमिका करत सिनेमाला योग्य न्याय दिला. यामुळे रोहित शेट्टी यशाच्या उच्च शिखरावर आहेत. सलमान-रोहित ही जोडी कलाविश्वात कल्ला करण्यासाठी सज्ज झाली आहे.
सुत्रांच्या सांगण्यानुसार रोहित शेट्टी आणि साजिद नाडियादवाला यांनी सलमान खानची भेट घेतली आणि त्याला सिनेमात काम करण्याचा विचार करण्यास सांगितले. 'किक' सिनेमात सलमान खानने देवी लाल सिंग (डेविल) ही भूमिका बजावली होती. सिनेमात सलमान खाकी वर्दीत चाहत्यांच्या भेटीस आला होता. याच सिनेमाला लक्षात घेत रोहित शेट्टीच्या सिनेमात सलमान खान पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
2010 मध्ये सलमानचा 'दबंग' सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमातील सलमानच्या अभिनयाचे गोडवे जगभर पसरले होते. याच सिनेमाच्या दुसऱ्या भागाने सुद्धा चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. सलमान सध्या अली अब्बाज दिग्दर्शित 'भारत' सिनेमाचे काम पूर्ण करत आहे. त्यानंतर दबंग 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र असणार आहे. वर्षाअखेरीस यशाच्या उच्च शिखरावर असलेली रोहीत आणि सलमानची जोडी एकत्र काम करणार आहे. याशिवाय रोहित शेट्टी बॉलिवू़डचा मिस्टर खिलाड़ी अक्षय कुमार सोबतही काम करतोय. 'सूर्यवंशी' सिनेमाच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.