`महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाटेल तसं...` चिन्मयच्या जवळच्या मित्राची जाहिर विनंती
Sameer Vidwans post for Chinmay Mandlekar : समीर विद्वांसनं चिन्मयची व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत त्याला विनंती केली आहे.
Sameer Vidwans post for Chinmay Mandlekar : गेल्या अनेक दिवसांपासून लेखक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तर त्याचं कारण त्याच्या मुलाचं नाव आहे. चिन्मयच्या मुलाचं नाव जहांगीर असल्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यावरून त्याच्या कुटुंबाला देखील अनेकांना ट्रोल केलं. या सगळ्याचा त्याच्या कुटुंबाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता. ट्रोलर्सचं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं मुलाचं नाव जहांगिर का ठेवलं असं म्हणतं लोक ट्रोल करु लागले. तर या सगळ्याला कंटाळून चिन्मयनं यापुढे महाराजांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय घेतला. त्याविषयी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं. दरम्यान, यावर मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसनं त्याची प्रतिक्रिया दिली नाही.
समीर विद्वांसनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून चिन्मयचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चिन्मय सांगताना दिसतोय की तो यापुढे महाराजांची भूमिका साकारणार नाही. तर हा व्हिडीओ शेअर करत समीर म्हणाला, "हे खूप जास्त दुर्दैवी आहे. आम्ही सगळे तू नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत. एक नक्की आहे की महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाटेल तसं बोलणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी आणि शिकवणीशी काहीही देणंघेणं नाहीये! त्यांना ते माहित असतील, असंही मला वाटत नाही! चिन्मय एक मित्र म्हणून, कलाकार म्हणून विनंती करतो की हा निर्णय मागे घे! आणि ज्या श्रध्देनं तू महाराजांची भूमिका करतोस ती करत रहा!" फक्त समीर नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना समीरचा हा निर्णय आवडला नाही. त्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : मुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणार
दरम्यान, चिन्मय व्हिडीओ शेअर करत म्हणाला की "नमस्कार माझं नाव चिन्मय मांडलेकर, व्यवसायाने मी एक अभिनेता आहे. लेखक आहे दिग्दर्शक आहे निर्माताही आहे. काल माझ्या पत्नीने नेहाने इन्साग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ होता माझ्या मुलाला ज्याचं नावं जहांगिर आहे. त्याच्या नावावरुन आम्हाला होणारं ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरुन आम्हाला येणाऱ्या अतिशय घाणेरड्या कमेंट्स त्या व्हिडीओनंतरही कमी झालेल्या नाही. माझ्या मुलाला आणि माझ्या पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल तर त्याच्यासाठी मी बांधिल नाहीये." त्यानंतर चिन्मयनं अनेक गोष्टींविषयी देखील सांगितलं.