Chinmay Mandlekar : लोकप्रिय अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर गेल्या अनेक दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याचं कारण आहे त्यानं मुलाला दिलेलं 'जहांगीर' हे नाव. चिन्मयनं एका मुलाखतीत मुलगा जहांगीरच्या नावाचा उल्लेख केल्यानं त्याला खूप ट्रोल करण्यात आलं. मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं असं म्हणतं त्याला आणि त्याच्या कुटूंबाला ट्रोल करण्यात आलं. कुटुंबाला होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून चिन्मयनं एक मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी चिन्मयनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे. याशिवाय तो ट्रोलर्सविरोधात पोलिसात तक्रार करणार का हे देखील चिन्मयनं सांगितलं.
चिन्मय मांडलेकरनं ही मुलाखत लोकमत फिल्मीला दिली होती. या मुलाखतीत चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न साकारण्याच्या निर्णयाविषयी सांगितलं आहे. चिन्मय म्हणाला की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. माझ्या मनावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतला. माझा मुलगा हा फक्त 11 वर्षांचा आहे आणि त्याला तर यागोष्टीची समजदेखील नाही. पण हे सगळं आम्ही कसं काय सहन करु शकतो? मी या आधी देखील मुलाखतीत अनेकदा बोललो आहे, मग आताच का अशा प्रकारची ट्रोलिंग होतेय? खरंतर अशा प्रकारच्या ट्रोलिंगवर कायदा आणायला हवा. सोशल मीडिया सुरु झाल्यापासून ट्रोलर्स ही जणूकाही समाजाला लागलेली एक कीड आहे. कोणी यांना थांबवू शकत नाही, त्यामुळे इतरांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. छत्रपती शिवरायांची माफी मागून फक्त माझ्या कुटुंबाच्या काळजीसाठी मी या भूमिकेतून रजा घेतोय.
पुढे चिन्मय ट्रोलर्स विरोधात पोलिसात तक्रार करणार का? याविषयी देखील बोलला आहे. चिन्मय म्हणाला की "अजूनतरी माझ्या घरात कोणी घुसलेलं नाही, तर या ट्रोलर्सला तशीही कोणतीच शिक्षा होत नाही आणि आजपर्यंत झालेली नाही. तरी मी सायबर पोलिसात तक्रार करत मी कायदेशीर मार्गाने जाईन."
अष्टकाचा दिग्दर्शक असलेल्या दिग्पालसोबत याविषयी बोलणं झाल्याचा खुलासा करत दिग्पाल म्हणाला, "दिग्पालसोबत माझं बोलणं झालं आहे. त्याला मी माझा निर्णय सांगितला आहे. पण आमच्यात काय बोलणं झालं ते आमच्यातच राहील. याविषयी मला बोलायचं नाही."