`हे सरकार तोंडाची वाफ घालवणारं नाही`; अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे विधान
Priya Berde : भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी सांगलीत हे सरकार करुन दाखवतं, मला याची फळं आता मिळत आहेत असं विधान केलं आहे.
Priya Berde : हे सरकार तोंडाची वाफ घालवणारं सरकार नाही. हे सरकार करुन दाखवतं, असं विधान अभिनेत्री आणि भाजपा (BJP) सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी केलं आहे. राज्यातलं सरकार तोंडाची वाफ घालवणार सरकार नसून करून दाखवणारे सरकार आहे. राज्यातल्या कलाकारांच्या बाबतीत या सरकारकडून नक्कीच चांगल्या गोष्टी होत आहेत, असं मत भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी सांगलीत (Sangli News) व्यक्त केले आहे.
सांगलीमध्ये भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठकडून आयोजित नवदुर्गा पुरस्कार सोहळया प्रसंगी त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांचा अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने करण्यात आला. यावेळी बोलताना प्रिया बेर्डे यांनी हे विधान केलं आहे.
'हे तोंडाची वाफ घालवणारं सरकार नाही. हे सरकार करुन दाखवतं. मला याची फळं आता मिळत आहेत. लवकरच आम्ही याबद्दल लोकांना सांगू. इतकी वर्षे काही झालेलं नसल्यामुळे लगेच दुसऱ्या महिन्यात काही होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पुढच्या वर्षभरामध्ये चांगले बदल लोकांना नक्कीच दिसतील,' असे प्रिया बेर्डे म्हणाल्या.
कलाक्षेत्राला भाजपमुळे न्याय मिळाला - प्रिया बेर्डे
"राजकारणाचा कोणताही अनुभव नाही, मात्र कलाकारांच्या व्यथा आणि समस्यांसाठी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. राजकारणामध्ये कोणतीही अपेक्षा नाही फक्त कलाकार जगला पाहिजे, हीच भावना आहे. वृद्ध कलाकारांना पेन्शनची मागणी आहेच. पण सर्वच कलाकारांना प्रतिमहिना मानधनही मिळाले पाहिजे, रोज काम मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राजकारणामध्ये येताच अनेक चित्रपट सोडले. कलाकारांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. कलाकार जगला पाहिजे हिच भावना आहे. कलाक्षेत्राला भाजपमुळे न्याय मिळाला आहे. आता महिलांना आरक्षणही मिळाले आहे. प्रत्येक महिलेने देवीची नऊ रुपे घेऊन बिनधास्तपणे समाजामध्ये वावरले पाहिजे. त्या नक्कीच चांगले काम करुन दाखवतील," असे प्रिया बेर्डे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश
प्रिया बेर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. प्रिया बेर्डे यांनी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र अवघ्या दोनच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.