सरफरोश (Sarfarosh) चित्रपटातील पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेने मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. या चित्रपटात मुकेश ऋषी यांनी पोलीस अधिकारी सलीमची भूमिका निभावली होती. आमीर खानची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट सुपरहिट झाला होता. दरम्यान मुकेश ऋषी यांनी चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. तसंच हा चित्रपट आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आवडता असल्याचंही सांगितलं आहे.
 
मुकेश ऋषी यांनी चित्रपटाशी संबंधित किस्सा शेअर करताना सांगितलं की, "चित्रपट रिलीज झाल्यानंतर मी माझ्या जम्मूच्या घऱी गेलो होतो. मला माता वैष्णोदेवीचं दर्शनही घ्यायचं होतं. मग विचार केला की, जाऊयात. मला वाटलं की या चित्रपटानंतर मला फार साऱ्या ऑफर्स येतील. मी दर्शनसाठी गेलो होतो, तेव्हाआमीर खानने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असावा. पण नेटवर्कची समस्या असल्याने मला कॉल आला नाही. मला नंतर सांगण्यात आलं की, आमीर खान मला फोन करण्याचा प्रयत्न करत होता, पण लागला नाही". 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Radio Nasha ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश ऋषी यांनी सांगितलं की, मी दर्शन घेतल्यानंतर आमीर खानला फोन केला. आमीरने मला विचारलं की, "कुठे आहेस? मी म्हटलं, मी तर जम्मूत आहे. आमीर म्हणाला, तू इथे मुंबईत हवा होतास. मला त्यावेळी तो असं का सांगतोय हे समजलं नाही. नंतर मला लक्षात आलं की, आमीरने योग्य सांगितलं होतं. पण त्यावेळी माझ्यात हा बिझनेस समजण्याइतपत अक्कल नव्हती".


मुकेश यांनी सांगितलं की, "चित्रपट हिट झाल्यानंतर आमीर खानने त्याच्या घऱी पार्टी ठेवली होती. या पार्टीत मलाही बोलावण्यात आलं होतं. त्या पार्टीत मला इंडस्ट्रीतील अनेकांना भेटण्याची संधी मिळाली. मला वाटलं की आता मला काम मिळणं सुरु होईल. एवढ्या लोकांना भेटलो आहे, तर नक्की कोणीतरी काम देईल. फिल्म इंडस्ट्रीत असताना तुम्ही जर पार्टीला गेलात तर तुमच्या करिअरला फार फायदा होतो".


"सरफरोश चित्रपटामुळे माझ्या करिअरला एक पूश मिळाला. हिंदी तर नाही पण अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स माझ्याकडे आल्या. यातील अनेक रोल निगेटिव्ह होते. माझ्यासाठी हे फारच आश्चर्यकारक होतं. कारण मी सरफरोश चित्रपटात चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावली होती. पण मला व्हिलनच्या रोलच्या ऑफर्स येत होत्या. मी करिअरमध्ये अनेक भूमिका केल्या पण सरफरोश चित्रपटासारखं प्रेम मिळालं नाही," असंही मुकेश ऋषी यांनी सांगितलं.