मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान choreographer Saroj Khan यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील 'मास्टरजी' आणि 'मदर ऑफ कोरिओग्राफी' अशी ख्याती असलेल्या सरोज खान यांनी २०० हून अधिक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले होते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरोज खान यांच्या निधनानंतर आता चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. या सगळ्यात सरोज खान यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर १४ जूनला सरोज खान यांनी इन्स्टावर ही पोस्ट शेअर केली होती. यामध्ये सरोज खान यांनी म्हटले होते की, मी तुझ्यासोबत कधी काम केले नसले तरी आपण अनेकदा भेटलो आहोत. तुझ्या आयुष्यात असे काय घडले की, तू इतक्या टोकाचा निर्णय घेतलास? तू मोठ्यांशी बोलायला पाहिजे होते, त्यामुळे तुला मदत झाली असती. आम्हालाही तुला काम करत असताना बघायला आनंद झाला असता. सुशांत, मला तुझं  प्रत्येक चित्रपटातील काम आवडलं होतं, अशा भावना सरोज खान यांनी इन्स्टाग्राम पोस्टमधून व्यक्त केल्या होत्या.



सुशांत सिंह राजपूत आणि सरोज खान यांच्या जाण्याने अनेकांना दु:ख झाले आहे. त्यामुळे ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सरोज खान यांनी २०१९ सालच्या करण जोहर दिग्दर्शित 'कलंक' चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून शेवटचे काम केले होते. या चित्रपटातील 'तबाह हो गये' या गाण्यासाठी Saroj Khan यांनी माधुरी दीक्षितला नृत्याचे धडे दिले होते. संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटातील 'डोला रे डोला', माधुरी दीक्षितच्या 'तेजाब'मधील 'एक दो तीन' आणि २००७ मध्या आलेल्या 'जब बी मेट' चित्रपटातील 'ये इश्क हाए' या गाण्यांसाठी सरोज खान यांना नृत्यदिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुस्कार मिळाला होता.

सरोज खान यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सरोज खान यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.