मुंबई : नवरात्रौत्सव म्हटलं की नऊ रंग, देवीची रुपं, आदिशक्तीचा महिमा या साऱ्या गोष्टी ओघाओघाने आल्याच. संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तर महिलांना साक्षात देवीचं रूप मानलं जात. पण हिच स्त्री आज भूमीवर सुरक्षीत नाही. अत्याचार, बलात्कारा सारख्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने एक अतिशय वास्तवदर्शी असा हा फोटो शेअर केला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामाख्या देवीचा आवतार घेत तिने कॅप्शनमध्ये 'वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश... प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची ) नवनिर्मिती करते तेव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे.'


'जिथे नदीला देखील अशा प्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेव्हा त्यासाठी कुणाला जवाबदार ठरवू मी ?' असा सवाल तिने उपस्थित केला. 


नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिने  अंबाबाईच्या रूपात फोटो शेअर केला होता. तिचे हे वास्तवदर्शी फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.