दीपिका-रणवीरच्या घराची सुरक्षा वाढवली
पदमावती रिलीज झाला तर दीपिकाचं नाक कापू, अशी धमकी करणी सेनेनं दिली होती. त्यानंतर मुंबईत प्रभादेवी...
मुंबई : पद्मावती चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातल्या कलाकारांच्या घराजवळची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पदमावती रिलीज झाला तर दीपिकाचं नाक कापू, अशी धमकी करणी सेनेनं दिली होती. त्यानंतर मुंबईत प्रभादेवी भागातल्या दीपिकाच्या घराबाहेर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
रणवीर सिंगच्या घराबाहेरही कडक सुरक्षा
तसंच अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगच्या घराबाहेरही कडक सुरक्षा तैनात करण्यात आलीय. काल रात्री उशिरापर्यंत रणवीर सिंह सनी साऊंड स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करत होता, तो घरी पोहोचल्यावर त्याला पद्मावती सिनेमाच्या वादासंदर्भात प्रतिक्रिया विचारली, पण रणवीरनं काहीही बोलायला नकार दिला.
रणवीरकडून काहीही बोलायला नकार
दरम्यान नाक कापण्याच्या धमकीनंतरही दीपिकाने पद्मावती हा सिनेमा रिलीज होणारच असं म्हटलं होतं. दुसरीकडे चितोडगड हा करणी सेनेने पर्यटकांसाठी बंद केला आहे. पद्मावती सिनेमा रिलीज करू नये, या मागणीसाठी चितोडगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.