मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान एकत्र काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही वडील- मुलाची ही जोडी 'द लायन किंग' या चित्रपटासाठी एकत्र आली आहे. आता तुम्ही म्हणाल लायन किंगमध्ये यांची वर्णी नेमकी कशी? तर, शाहरुख आणि आर्यन आपला आवाज देणार आहेत. शाहरुख 'मुफासा' तर आर्यन 'सिम्बा' या पात्राला आवाज देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द लायन किंग' हा असा चित्रपट आहे जो माझ्या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येकाचा आवडता आहे. या चित्रपटाला आमच्या सर्वांच्याच मनात एक वेगळं स्थान आहे. एक वडील म्हणून 'मुफासा' या पात्राशी आणि मुफासाचं त्याच्या मुलाशी असणारं नातं पाहता मी या पात्राशी अधिक चांगल्या जोडलो गेलो असल्याचं' शाहरुखने म्हटलं आहे. 


भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शाहरुखने आर्यन आणि त्याचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये दोघांनीही निळ्या रंगाची जर्सी घातलेला आणि शाहरुखच्या जर्सीवर 'मुफासा' तर आर्यनच्या जर्सीवर 'सिम्बा' असं लिहिलेला फोटो पोस्ट केला होता. 



'द लायन किंग'ला अनेक वर्षांपासून लोकप्रियता मिळाली आहे. असा हा चित्रपट पुन्हा एकदा एका नव्या रुपात येत असताना आर्यनसोबत काम करणं हे माझ्यासाठी अतिशय खास आहे. अब्राहम हा चित्रपट पाहणार आहे त्यासाठी आम्ही अधिक उत्साहित असल्याचं'' शाहरुखने म्हटलं आहे. 


'हा चित्रपट 'डिस्ने'तर्फे नव्या संकल्पनांच्या आधारावर पुन्हा साकारण्यात आला आहे. चित्रपट अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचवणे हे आमचं ध्येय आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये तयार करण्याच्या चर्चेवेळी त्यातील प्रमुख 'मुफासा' आणि 'सिम्बा' ही पात्र ध्वनीमुद्रित करण्यासाठी इतर कोणत्याही कलाकारांच्या नावांची कल्पनाच आम्हाला सुचली नाही' असं 'डिस्ने इंडिया'चे प्रमुख विक्रम दुग्गल यांनी म्हटलंय. 


'द लायन किंग' पहिल्यांदा १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला २५ वर्षे झाल्यानंतर डिस्नेने पुन्हा याच कथेला एका नव्या रुपात सादर करत पर्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटात 'मुफासा' सिंह आणि त्याचा मुलगा 'सिम्बा'ची कथा आहे. भारतात १९ जुलै रोजी 'द लायन किंग' इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमधून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.