Shahrukh Khan on Pathaan Sucess: बॉलिवूड बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक रेकॉर्ड मोडले असून करोडोंची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेलं यश साजरं करण्यासाठी मुंबईत नुकतंच एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाहरुख खान, दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) उपस्थित होते. शाहरुखने यावेळी अप्रत्यक्षपणे चित्रपटावरुन झालेल्या वादावर भाष्य करताना हे फक्त मनोरंजन असून, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं सांगितलं आहे. एकतेचं उदाहरण देताना शाहरुखने यावेळी दीपिका अमर, मी अकबर आणि जॉन अँथनी (Amar Akbar Anthony) असल्याचं म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ही दीपिका आहे, ही अमर आहे. मी शाहरुख खान अकबर आणि जॉन अब्राहम अँथनी आहे. यानेच सिनेम घडतो. आमच्यापैकी कोणामध्येही मतांतर नाही. कोणतीही संस्कृती असो किंवा आयुष्याचा कोणताही भाग असो. आमचं तुमच्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही चित्रपट तयार करतो. आम्हाला तुम्हाला प्रेम द्यायला आवडतं. आम्हाला प्रेम द्या, आम्हीही प्रेमाचे भुकेले आहोत," असं शाहरुखने म्हटलं आहे. 


वाद निर्माण करणाऱ्यांना उत्तर


अभिनेते फक्त ते पात्र रंगवत असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नसतो असं सांगत शाहरुखने म्हटलं की, सिनेला हा आनंद, बंधुभाव, प्रेम आणि चांगली भावना देत असतो. "जेव्हा आम्ही चित्रपट तयार करतो तेव्हा आनंद, बंधुभाव, प्रेम देण्याचा प्रयत्न असतो. जेव्हा 'डर' चित्रपटात मी व्हिलन साकारतो किंवा जॉनने या चित्रपटात साकारलं आहे ही फक्त पात्रं आहेत. यामधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसतो. हे फक्त मनोरंजन आहे," असं सांगत शाहरुखने अप्रत्यक्षपणे चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या वादावर भाष्य केलं. 


शाहरुख खानचा पठाण चित्रपट सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने जगभरात 500 कोटींची कमाई केली आहे. 100 देशातील 8000 स्क्रिन्सवर चित्रपट प्रदर्शित झाला असून हिंदी चित्रपटासाठी हा रेकॉर्ड आहे. 


"आपण आपली संस्कृती, जुन्या गोष्टी या सर्व देशात जिवंत ठेवल्या आहेत. भारत आपला सुंदर देश आहे. आपल्याला आधुनिक आणि वेगळ्या पद्धतीने कथा मांडायच्या आहेत. जेव्हा त्या वेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात तेव्हा त्याचा अर्थ आपण कोणाचाही अपमान करत आहोत असा होत नाही. आपण फक्त तरुणांची भाषा बोलण्याचा प्रयत्न करत आहोत जी बदलली आहे," असं शाहरुखने स्पष्ट केलं. 


बेशरम गाण्यात दीपिकाने भगवी बिकिनी परिधान केल्याने वाद निर्माण झाला होता. अनेक हिंदू संघटनांनी चित्रपटाला विरोध केला होता.