शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली तेव्हा बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली होती. यानंतर आर्यन खानची सुटका झाली आणि त्याला निर्दोषही ठरवण्यात आलं. पण शाहरुख खानने या प्रकरणावर जाहीरपणे भाष्य करणं टाळलं होतं. चित्रपटांचं प्रमोशन करतानाही त्याने मीडियाशी संवाद साधण्याऐवजी सोशळ मीडियावरुन चाहत्यांशी संपर्क साधण्याला प्राधान्य दिलं होतं. दरम्यान बुधवारी शाहरुख खानने एक पुरस्कार स्वीकारताना कुटुंबाला मागील काही वर्षात सामोरं जावं लागलेल्या अडचणी आणि त्यातून मिळालेला धडा याबद्दल सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मागील 4 ते 5 वर्षं मी आणि माझ्या कुटुंबासाठी एक मोठा प्रवास होती. करोनामुळे तुम्हालाही हा काळ कठीण गेला असेल याची मला कल्पना आहे. माझे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले होते. चित्रपट विश्लेषकांनी तर आता माझं करिअर संपल्याचं सांगण्यास सुरुवात केली होती," असं शाहरुख म्हणाला. यावेळी त्याने चित्रपट समीक्षकांची तुलना मूर्खांशी केली. यानंतर त्याने खासगी आयुष्यात आलेल्या समस्यांवर भाष्य करत 2021 मधील आर्यन खानच्या अटकेचा उल्लेख केला. आर्यन खान जवळपास एक महिना जेलमध्ये होता. यानंतर त्याच्यावरील सर्व आरोप हटवत निर्दोष ठरवण्यात आलं होतं. 


शाहरुख खान म्हणाला की, "वैयक्तिक पातळीवर थोड्या त्रासदायक आणि अप्रिय गोष्टी देखील घडल्या, ज्यामुळे मी धडा शिकलो. शांत राहा, खूप शांत राहा आणि सन्मानाने कठोर परिश्रम करा. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सर्वकाही चांगलं आहे अचानक तुम्हाला मोठा धक्का मिळतो".


"पण हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला आशावादी, प्रामाणिक कथाकार होण्याची गरज आहे," असंही शाहरुख म्हणाला. यावेळी त्याने 'ओम शांती ओम' चित्रपटातील एक डायलॉग बोलून दाखवला. जोपर्यंत शेवट गोड नाही, तोपर्यंत अजून अंत झालेला नाही असं तो म्हणाला. 


शाहरुख  खानने यावेळी कबूल केलं की, त्याच्या पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व" व्यवसाय केला. तसंच चित्रपट यशस्वी करणारे बरेच प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे चाहते नसेल तरी पाठिंबा देण्यासाठी होते हेदेखील सांगितलं. शाहरुख खानच्या पठाण, जवान आणि डंकी चित्रपटांनी एकूण 2500 कोटींचा व्यवसाय केला आहे. शाहरुखने अद्याप आपल्या पुढील चित्रपटाची घोषणा केलेली नाही.