The Kerala Story पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंचा हिंदू मुलींच्या पालकांना इशारा! म्हणाले, `वेळ निघून गेली तर...`
Sharad Ponkshe On The Kerala Story: या चित्रपटाला काही पक्ष विरोध करत आहेत, पण त्याकडे लक्ष देऊ नका असंही शरद पोंक्षेंनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी `लव्ह जिहाद`चा उल्लेख करत हिंदू मुलींच्या फसवणुकीसंदर्भात आपलं मत या व्हिडीओमध्ये मांडलं आहे.
Sharad Ponkshe On The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची (The Kerala Story) सध्या देशभरामध्ये चर्चा आहे. या चित्रपटावरुन दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Modi) ते वेगवेगळ्या राजकारण्यांपर्यंत अनेकांनी यावर भाष्य केलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून 'लव्ह जिहाद'चं वास्तव्य दाखवलं जात असल्याचं चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्यांचं म्हणणं आहे तर हा चित्रपट सत्य कथेवर आधारित नसल्याचं विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे. या मतंमतांतरांमुळे हा चित्रपट चर्चेत असतानाच मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षेंनी (Sharad Ponkshe) सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने चित्रपटगृहात जाऊन पाहावा असं आवाहन केलं आहे. तसेच पोक्षेंनी 'लव्ह जिहाद'चा उल्लेख करत पालकांनाही इशारा दिला आहे.
"जिहादच्या नावावर आपल्या मुली, बहिणींना..."
शरद पोंक्षेंनी आपल्या फेसबुक, इन्स्ताग्राम आणि युट्यूब चॅनेलवरुन हा चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी, ''नमस्कार, मी शरद पोंक्षे! आज मी तुमच्या समोर आलोय त्याचं कारणही तसंच आहे. कारण काल रात्री मी 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहिला आणि प्रचंड अस्वस्थ झालो. मी रात्रभर झोपू शकलो नाही. चित्रपटांमधील काही दृष्यं माझ्या डोळ्यांसमोर वारंवार दिसत होती," असं म्हणत सुरुवात केली आहे. तसेच पुढे बोलताना, "हा चित्रपट पाहिल्यावर मला वाटलं की व्हिडीओ बनवावा आणि प्रत्येक देशवासियाला हा चित्रपट पाहण्यास सांगावं. कशाप्रकारे धर्मांतरण केलं जात आहे. जिहादच्या नावावर आपल्या मुली, बहिणींना फसवलं जात आहे. फारच चांगल्या पद्धतीने विपुलजींनी हा चित्रपट बनवला आहे. मी विपुल शाह यांचं अभिनंदन करतो आणि सर्व भारतीयांच्यावतीने त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हे चित्रिकरण करण्याचं धैर्य दाखवलं आहे. मी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे आभार मानतो की त्यांनी इतका महत्त्वाचा, संवेदनशील आणि धाडसी विषय हाताळला,'' असं शरद पोक्षेंनी म्हटलं आहे.
"हिंदू मुली 'लव्ह जिहाद'मध्ये अडकतात कारण..."
हिंदू मुलींना कशाप्रकारे अडकवलं जातं यासंदर्भातील भाष्यही पोंक्षे यांनी या व्हिडीओमध्ये या चित्रपटाचा संदर्भ देत केलं आहे. ''हा चित्रपट पाहून मी विचार केला की हे आपल्याच बाबतीत का होतं? हिंदू मुलींना 'लव्ह जिहाद'मध्ये कसं अडकवलं जातं आणि त्या कशा अडकतात? तर त्याचं मूळ कारण आहे की आपल्याला आपली संस्कृती माहीत नाही, परंपरा माहीत नाही,'' असं पोंक्षे म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "आपल्या देवांची माहिती नाही, त्याच्या उत्पत्तीबद्दलची माहीत नाही. एखाद्या देवाला हेच वाहन का हेही माहीत नसतं अनेकांना. हे माहिती नसण्याचं कारण आपण आपल्या मुलांना हे सांगत नाही. आपण मॉडर्न होण्याच्या नादात आपल्या मुलांना आपलीच संस्कृती शिकवली नाही. म्हणूनच ते आपल्या हिंदू मुलींना जाळ्यात ओढतात आणि त्यांना फसवतात," असं विधान पोक्षे यांनी केलं आहे.
"हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा म्हणजे..."
या चित्रपटावरुन सुरु असलेल्या राजकारणावरही पोंक्षे यांनी भाष्य केलं आहे. ''प्रेम ही अशी गोष्ट आहे, जिथे कुणीच काही बोलू शकत नाही. आपल्या मुलींना फसवलं जातं. म्हणून मी आवाहन करतो की प्रत्येक हिंदू कुटुंबाने, तरुण मुलींनी हा चित्रपट पाहावा. याला (या चित्रपटाला) काही पक्ष विरोध करत आहेत, पण त्याकडे लक्ष देऊ नका. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा म्हणजे कळेल किती भयानक वास्तव आहे," असं पोंक्षेंनी म्हटलं आहे.
"...तर आपल्या हातात काहीच उरणार नाही"
''काही पक्ष हा चित्रपट खोटा आहे म्हणून ओरडत आहेत पण जोपर्यंत आपल्या घरात आग लागत नाही तोवर हे कळत नाही. जेव्हा तुमच्या मुलींना असं फसवलं जाईल तेव्हा तुमचे डोळे उघडणार आहेत का? त्यामुळे मी विनंती करतो, या जिहादपासून आपल्या मुलींना वाचवायचं असेल तर कृपया हा चित्रपट पाहा. कारण वेळ निघून गेली तर आपल्या हातात काहीच उरणार नाही. त्यामुळे सावध व्हा,' असंही पोंक्षेंनी या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर पालकांना आवाहन करताना म्हटलं आहे.