मुंबई : बिग बॉस फेम आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री शहनाज गिलचे वडील संतोख सिंग सुख यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. अमृतसरच्या जंदियाला गुरु परिसरात शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. खरेतर एका ठिकाणी त्यांनी कार बाजूला उभी केली, ज्यानंतर त्यांचे सुरक्षा कर्मचारी जवळच्या ढाब्याजवळील शौचालयात गेले तेव्हा ही घटना घडली. या दरम्यान दोन जण दुचाकीवरून आले आणि कारजवळ थांबले. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी ही घटना जेव्हा घडली, तेव्हा संतोख सिंग ड्रायव्हरसोबत त्यांच्या कारमधून प्रवास करत होते. नशीबानं या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. संतोख सिंग यांचे प्राण वाचले आहेत.


दोन दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शनिवारी काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते अमृतसरहून बियासला जात होते. त्यादरम्यान ही घटना घडली.


त्या दुचाकीस्वारांनी संतोख सिंग यांच्या गाडीवर चारवेळा गोळ्या झाडल्या, ज्यानंतर गोळ्यांचा आवाज ऐकून त्याच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी हल्लेखोरांवर विटा फेकल्या, ज्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला.  या घटनेनंतर संतोख सिंग यांनी तत्काळ जंदियाला गुरु पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.


पोलिसांना वेळीच या घटनेची माहिती देण्यात आली, मात्र अद्याप त्यांनी या प्रकरणाबद्दल गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोपी संतोख सिंग यांनी केला.


या प्रकरणाबाबत माहिती देताना जंदियाला गुरु पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर हरप्रीत सिंग यांनी सांगितले की, "पोलिसांनी घटनास्थळावरून चार रिकामे खोके जप्त केले आहेत. प्राथमिक तपासणीनंतर, हे प्रकरण काहीसे संशयास्पद असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे पुढील तपास सुरू आहे. संतोख सिंग यांच्यावर अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल असल्याने त्याची सुरक्षा अलीकडेच काढून घेण्यात आली आहे."


हरप्रीत सिंग म्हणाले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून योग्य ती कारवाई केली जाईल.



एका वृत्तानुसार, संतोख सिंग यांच्या या तक्रारी मागे, त्यांना त्यांचे पोलिस संरक्षण परत मिळवायचे असावे आणि याची शक्यता नाकारता येत नाही. 


एसएसपी देहत यांच्या अहवालानुसार, संतोख सिंग सुख यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.