मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्या क्षणापासून ते अगदी आतापर्यंत वाटेतले अडथळे काही कमी झाले नाहीत. आज महाराज आपल्यात नाहीत. पण, तरीही त्यांच्या कर्तृत्त्वाची किर्ती मात्र आपला ऊर अभिमानानं भरते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजाच इतका धाडसी असल्याच त्याच्या प्रजेबद्दल काय आणि किती सांगावं, हाच प्रश्न पडतो. छत्रपती शिवरायांच्या जीवनप्रवासात असे अनेक प्रसंग घडून गेलेल जिथं त्यांच्यातला राजा, शूरवीर आणि मोठ्या मनाचा व्यक्ती वेळोवेळी पाहता आला. 


अशा या राजाची आणखी एक धाडसी मोहिम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वराज्यावर सावट होऊन आलेल्या शत्रूला पायदळी तुडवून त्यांच्या छाताडात भगवा गाडायचा असं म्हणणारे महाराज सर्वांच्या भेटीला आले आहेत. 


निमित्त आहे ते म्हणजे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपट, 'शेर शिवराज'. चिन्मय मांडलेकर, मुकेश रिषी, चिन्मय मांडलेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून पुन्हा एकदा शिवकालीन प्रसंग साकारला जाणार आहे. (Sher Shivraj trailer video)


नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामध्ये मुख्य पात्र लक्ष वेधत असतानाच खलनायकी भूमिकाही नजर खिळवून ठेवत आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकरही या चित्रपटातून नकारात्मक भूमिकेत झळकताना दिसत आहेत. 



'पावनखिंड'च्या अफाट यशानंतर आता दिग्पाल लांजेकर नव्यानं आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. 22 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


तेव्हा आता 'शेर शिवराज' नेमकी काय आणि किती कमाल करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.