मुंबई : अभिनेत्री शिवानी सुर्वे, हिचा चाहतावर्ग वाढत असलेला दिसत आहे. ही गुणी अभिनेत्री, 'ट्रिपल सीट' या सिनेमात अंकुश चौधरी याची नायिका म्हणून पाहायला मिळाली. 'झी टॉकीज'वर होणार असलेल्या 'ट्रिपल सीट'च्या प्रीमियरच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या खास गप्पांची ही झलक;


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. 'ट्रिपल सीट' चित्रपटातील भूमिका किती आव्हानात्मक वाटली?
तन्वी प्रधानची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. ती एका लहान घरात वाढलेली मुलगी आहे. तिचे घरच्यांसोबतचे संबंध, तिचं त्या वयातील वागणं, या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करावा लागला. 


२. चित्रपटातील भूमिका आणि शिवानी यांच्यात काही साधर्म्य आहे का?
नक्कीच. काही प्रमाणात तन्वी आणि शिवानीमध्ये साधर्म्य आहे असं मी म्हणेन. सगळ्याच गोष्टी सारख्या नाहीत, पण तन्वी आणि शिवानी दोघी बडबड्या आहेत. 


३. सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
बाप्पा जोशी आणि माझी खूप छान मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना, मित्रांसोबत मजा करत असल्यासारखं वाटतं. अंकुश सरांकडून सुद्धा खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सुरुवातीला, एका मोठ्या स्टारसोबत काम करत असल्याचे दडपण होते. पण, नंतर सगळ्या गोष्टी अगदीच नॉर्मल वाटू लागल्या. 


४. शूटिंगदरम्यानचा एखादा अनुभव, गमतीशीर किस्सा किंवा आठवण आम्हाला सांग. 
शूटिंगच्यावेळी लवकर येऊन सगळ्यांनी भेटणं. सीन वाचणे, त्यावर चर्चा या सर्व गोष्टी होत असत. यासगळ्याबरोबरीनेच आम्ही भरपूर धमाल करायचो. अहमदनगरला असताना, अनेक ठिकाणी जाऊन भरपूर पेटपूजा करण्याचं काम सुद्धा आम्ही केलं. अंकुश सर, प्रवीण सर आणि मी असे तिघेही खाण्याच्या बाबतीत हौशी असल्याने हे उद्योग आम्ही केले. 


५. तू तुझ्या खऱ्या आयुष्यात असं कॉल करून कुणाला फसवलं आहेस का?
मी एका मैत्रिणीची अशी मस्करी करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या चलाख मैत्रिणीने मला पकडलं. तिची मस्करी करण्याच्या नादात त्यावेळी माझाच पोपट झाला होता. 


६. खरोखरंच कुणाला असा कॉल करून, त्याची गम्मत करायची असेल, तर त्यासाठी तू कुणाला 'बकरा' बनवशील? 
मी ज्या नंबरवरून असा कॉल करते आहे, त्याव्यक्तीकडून कुठलाही गैरवापर होणार नाही, याची खात्री असेल, तर मी ही अशी मस्करी करण्याचा विचार करेन. माझा नंबर माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे असल्याने, दुसऱ्याच नंबरवरून कॉल करावा लागेल. कुणाला बकरा करायचं झाल्यास, मी माझ्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीला, आजीच्या फोनवरून त्रास देईन.