शिवसेनेचा `टायगर` अभी जिंदा है... देवा वाद
बॉलिवूड विरूद्ध मराठी सिनेमा अशा वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे.
मुंबई : बॉलिवूड विरूद्ध मराठी सिनेमा अशा वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे.
मराठीचा मुद्दा कायम मांडणारी शिवसेना आता मराठी कलाकार आणि निर्मात्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. मंगळवारपासून सलमान खानचा "टायगर जिंदा है" आणि अंकुश चौधरीच्या "देवा" या सिनेमावरून वाद सुरू आहे. सलमानच्या सिनेमामुळे मराठी सिनेमांना प्राइम टाइमचे शो थिएटर्समध्ये मिळत नाही हा मुद्दा चर्चेत आहे. मराठी सिनेमांना थिएटर्स मिळाले नाहीत तर मनसे आक्रमक होईल आपला खळखट्याक रूप दाखवेल असं म्हणत असताना आता या मुद्यात शिवसेनेने उडी घेतली आहे.
यशराज फिल्म्सला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा धमकी वजा इशारा दिला आहे. मराठी सिनेमांना थिएटर्स मिळायला हवा. मराठी निर्मात्यांची अवस्था देखील फेरीवाल्यांसारखी झाली असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
याला मुजोरीच म्हणावे लागेल. मराठी चित्रपटांसाठी काही शो राखीव आहेत. ते जर मिळत नसतील तर ते कायद्याचे उल्लंघन आहे. मुख्यमंत्र्या़नी आता सांगावे हे सहन करणार नाही म्हणून. टायगर अभी जिंदा है विरुद्ध देवा या वादात शिवसेनेची भूमिका. दादासाहेब फाळकेंच्या या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांविरूद्ध ही मुजोरी चालू देणार नाही. यशराज फिल्म्सला शिवसेनेचा धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. 'आजही या महाराष्ट्रात शिवसेनेचा टायगर जिंदा आहे, असं मत शिवसेना नेता संजय राऊत म्हणाले.
मराठी सिनेमाच्या या वादावर नितेश राणे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र मध्ये ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल तर ते थियटरस ना कुठलाच टायगर वाचु शकणार नाही!! महाराष्ट्र मध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असं मत नितेश राणेंनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता मराठी सिनेमांसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे दिसत आहे.
सिनेमांच्या प्रदर्शनावरून पुन्हा एकदा हा मुद्दा पेटला आहे. 22 डिसेंबर रोजी अंकुश चौधरीचा देवा हा सिनेमा, प्रिया बापटचा गच्ची हा सिनेमा आणि सलमान खानचा टायगर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. काही जणांच्या मनात हा देखील प्रश्न आहे की, खरंच यांचे प्राइम टाईमच्या मुद्यावरून वाद आहे की, हा प्रमोशनचा फंडा आहे हे कळत नाही.