धक्कादायक! पोलिसावर उपचार करण्यासाठी चार रूग्णालयांचा नकार....
अहोरात्र सेवेत असणाऱ्या पोलिसांकडेच दुर्लक्ष
मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला वेढीस धरलं आहे. संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशावेळी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या सेवेत पोलिस आणि डॉक्टर अहोरात्र नागरिकांसाठी कोरोनाशी लढत आहेत. पण अशा अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या पोलिसांना आणि डॉक्टरांनाच वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांनी घरातच राहावं यासाठी पोलिसा जीवाची पर्वा न करता अहोरात्र रस्त्यावर कार्यरत आहे. पण आजारी पोलिसाला दाखल करून घेण्यास एक दोन नव्हे तर चार महापालिकेच्या रूग्णालयांनी नकार दिला. अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीमुळे या पोलिसाला मंगळवारी रात्री केईम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे. (Coronavirus : भारतीय महिला डॉक्टरला अमेरिकेतील नागरिकांकडून कडक सल्यूट)
कुर्ला वाहतूक विभागातील एका पोलीस हवालदार यांना ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. मात्र प्रकृतीत फारसा फरक न पडल्यामुळे घाटकोपरमधील राजावाडी रूग्णालयात नेण्यात आलं. तेथील डॉक्टरांना कस्तुरबामध्ये नेण्यास सांगितलं. मुलाला सोबत घेऊन पोलीस कस्तुरबा रूग्णालयात गेले. मात्र तेथे जागा नसल्यामुळे नायर रूग्णालयात जाण्याची सूचना केली. मात्र तेथे ही त्यांच्यावर उपचार न करता त्यांना केईएममध्ये जाण्यास सांगितले.
दिवसभर पोलिसावर आजारी असताना औषधोपचार न करता एकामागे एक असे चार रूग्णालयातून फिरवण्यात आले. केईएममध्ये देखील रात्री ९ वाजले असले तरीही उपचार करण्यास मनाई केली.
अखेर हवालदिल झालेल्या या पोलिसाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्यावर रात्री १० वाजता उपचार करण्यात आले. आपल्यासाठी अहोरात्र सेवेत असणाऱ्या एका पोलिसाला स्वतःच्या उपचारासाठी असं वणवण फिरत असेल तर आपण यांच्याप्रती खरे कृतज्ञ आहोत का हा प्रश्न उभा राहत आहे.