मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकाकास्टिंग फाऊंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे  चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. आज यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी  मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींचा अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानुसार आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येईल. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे असून नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील असेही यात म्हटले आहे. कोविड संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील  सुचना यासाठी लागू राहतील.  


 या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरीता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ , दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. 


दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पुन्हा एकदा चित्रीकरण करता येणार आहे. अनेक सिनेमांच शुटिंग अर्धवट राहिले आहेत. तसेच काही मालिकांच शुटिंग अर्ध्यावरच बंद करण्यात आलं आहे. या सगळ्या गोष्टी पुर्ववत करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. 


भारताला कलेचा वारसा लाभला आहे. सिनेसृष्टीत खूप मोठी उलाढाल होत असते मात्र कोरोनामुळे सगळीकडेच लॉकडाऊन आहे. सिनेसृष्टीवर अनेकांची कुटूंब अवलंबून आहेत. अनेकांना सिनेसृष्टीतून रोजगार मिळत असतो. पण अचानक लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे या कुटुंबांसमोर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाने मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे.