मोदी पुन्हा निवडूण येतील का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत श्रेयस तळपदे म्हणाला, ` माझ्या मते ते...`
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.
Shreyas Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे हा हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत चांगली कामगिरी करताना दिसतो. श्रेयसनं त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांना सगळ्याच भावना दाखवल्या कधी त्यानं हसवलं तर कधी रडवलं. नुकताच त्याचा 'कर्तम् भुगतम्' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानिमित्तानं श्रेयसनं एक मुलाखत दिली आहे. त्यावेळी अनेक गोष्टींविषयी बोलत असताना श्रेयसनं त्याचे आवडते राजकारणी यांच्याविषयी सांगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे.
श्रेयसनं ही मुलाखत 'लोकमत फिल्मी'ला दिली आहे. या मुलाखतीत श्रेयसवा सध्याच्या काळातले कोणते राजकीय नेते आवडतात या विषयी विचारण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर देत श्रेयसनं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं आणि म्हणाला "बाळासाहेब ठाकरे मला एक प्रभावी नेते वाटतात. त्यांचा खूप मोठा जनसंपर्क होता आणि इतकंच नाही तर त्यांच्या सभांना गर्दी देखील तितकीच असायची. शिवाजी पार्कात लाखोच्या संख्येनं लोक फक्त त्यांच्या सभांसाठी गर्दी करायचे. त्यामुळे आधीच्या काळातले बाळासाहेब ठाकरे हे मला आदर्श नेते वाटतात."
श्रेयस तळपदे पुढे सध्याच्या काळात त्याचे आवडते राजकीय व्यक्ती कोण आहेत ते सांगत म्हणाला, "सध्याच्या राजकारणाकडे पाहायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मला फार कौतुक आहे. गेली 10 वर्ष मोदीजी देशाचं काम करत आहेत. मोदीजी हे आधी देशाचा विचार करतात. अटलबिहारी वाजपेयी सुद्धा असेच होते. जनतेचा नरेंद्र मोदीजी यांना पाठिंबा आहे. त्यामुळे एकूणच सध्याचं चित्र पाहता नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हं दिसतायत."
दरम्यान, श्रेयस तळपदेचा 'कर्तम् भुगतम्' हा चित्रपट 17 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात श्रेयससोबत अक्षा परदासनी, मधु आणि विजय राज हे कलाकार दिसत आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सोहम शाहनं केलं आहे. त्याशिवाय त्यानंच या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. तर रविवारी 19 मे रोजी राष्ट्रपती भवनात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना हा सिनेमा दाखवण्यात आला. तर या चित्रपटाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.