गंगटोक : आपण बहुआयामी व्यक्तिमत्त्वं असावं, असं सर्वांनाच वाटत असतं. विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य मिळवण्याच्या हेतूनं मग सुरुवात होते ती म्हणजे ध्येय्यप्राप्तीच्या दिशेनं वाटचाल करण्याची. महत्त्वाकांक्षेच्या बळावर ही स्वप्न सहजपणे साकारली जातात. सध्या अशाच एका स्वप्नाळू तरुणीनं साऱ्यांच्याच नजरा वळवल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉडेलिंग, बाईक रायडिंगपासून संरक्षण दलाच्या सेवेत रुजू असण्यापर्यंतची जबाबदारी ही तरुणी पार पाडत आहे. तिचं नाव आहे इक्षा हँग सुब्बा. (Eksha Hang Subba) उर्फ इक्षा केरुंग (eksha kerung). पोलीस सेवेत कार्यरत असण्यासोबतच इक्षा राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सरही आहे. शिवाय ती बाईक रायडिंगमध्येही पुढे असते. 


'एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द ईयर सीजन 2' मधील टॉप 9 स्पर्धकांमध्येही तिला स्थान मिळालं.


2019 मध्ये सिक्कीम पोलिसांच्या सेवेत रुजू होणाऱ्या इक्षाचा रस आधीपासूनच मॉडेलिंगमध्ये होता. ज्यामुळं ती या सुपरमॉडेल... शोपर्यंत पोहोचली. आपली ओळख करुन देतानाच इक्षाचे शब्द ऐकून अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा हिनं तिला उभं राहून दाद दिली होती. 





वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी इक्षा सिक्कीम पोलीस दलात दाखल झाली. सध्य़ा ती पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. इतकंच नव्हे तर, मॉडेलिंगइतकंच ती आपल्या कामावरही भरभरुन प्रेम करते. 


बाईक रायडिंगचा आनंद घेणारी आणि राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिगपटू असणारी इक्षा सुपरमॉडेल होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही, जिथं महिला स्वत:ला सिद्ध करु शकत नाहीत, हे दाखवून देण्यासाठीच इक्षानं नव्या वाटा काय़मच निवडल्या आहेत. चौकटीबद्ध राहणीमान झुगारत कक्षा रुंदावणारी ही सुपरवुमन कोणाच्या आदर्शस्थानी आली, तर यात वावगं काहीच नाही, अशीच प्रतिक्रिया तिच्या फॉलोअर्सनी दिली आहे.