`या` सेलिब्रिटीच्या मुलीने थेट रेहमान यांना व्हिडिओ कॉल केला अन्....
त्यावेळी रेहमान फार व्यग्र होते
मुंबई: कोणाला चुकून फोन लागला की अनेकांचीच तारांबळ उडते. अनेकदा समोरच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी विषयही सापडत नाहीत. अशा वेळी मग काय बोलावं, बोलावं अशा विचाराने एखादा असा विषय निघतो की विचारुन सोय नाही. पण, हाच चुकून लागलेला दिवस जर एखाद्यासाठी तितकाच महत्त्वाचा असेल तर.....?
कलाविश्वात सध्या चर्चा होतेय ते म्हणजे अशाच एका फोनची, फेसटाईमची. गायक. संगीतकार आणि म्युझिकल माएस्ट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ए.आर. रेहमान यांना एक असा 'फेसटाईम कॉल' आला ज्यामुले त्यांच्या चेहऱ्यावर हसूनच उमटलं.
रेहमान यांना फोन केला तो म्हणजे गायक अदनान सामीच्या एक वर्षाच्या चिमुरडीने.
खुद्द सामीनेच एक ट्विट करत याविषयीची माहिती दिली. आता फोनला पासवर्ड लावण्याची वेळ आली आहे, असं म्हणत त्याने आपल्यी मुलीची ही गोड करामत सर्वांना सांगितली.
अदनानच्या मुलीने खेळता खेळता त्याच्या फोनवरुन रेहमान यांना फेसटाईम केलं. त्यावेळी ते लंडनमध्ये आगामी '२.०' या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रणात व्यग्र होते. पण, तरीही तिला वेळ देत, तिच्याशी संवाद साधत त्यांनी आपला स्टुडिओही तिला दाखवला.
रेहमान यांचे आभार मानत सामीने त्यांच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.
इथे रेहमान यांनीही अदनानच्या मुलीच्या एका व्हिडिओ कॉलने आपल्या चेहऱ्यावर आनंद आणल्याचं सांगत तिला शुभाशिर्वाद दिले.
रेहमान आणि सामी यांच्यात सोशल मीडियावरुन झालेला हा संवाद पाहता या दोघांनाही एक वेगळाच आनंद झाल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या आनंदाचं कारण मात्र एकच आहे, असं म्हणायला हरकत नाही.