गायकांना लाईव्ह कॉन्सर्टमध्ये वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. कधी चाहते त्यांच्या दिशेने ड्रिंक, मोबाईल, फुलं किंवा इतर गोष्टी फेकत आपलं प्रेम व्यक्त करत असतात. पाकिस्तानी गायक आतिफ असलम यालाही नुकतंच अशा एका अनुभवाला सामोरं जावं लागलं. आपल्या चाहत्याच्या गैरवर्तनामुळे संतापलेल्या आतिफ असलमने यावेळी मध्यातच कॉन्सर्ट थांबवलं आणि त्याला खडेबोल सुनावले. अमेरिकेत हे कॉन्सर्ट सुरु होतं. दरम्यान, यावेळी आतिफ असलमने चाहत्याला संयम बाळगत ज्याप्रकारे सल्ला दिला ते पाहून त्याचं कौतुक केलं जात आहे. आतिफ असलम याच्यासह यावेळी अरिजीत सिंग, कॅनडीयन रॅपर ड्रेक, बेब रेक्सा, कार्डी बी आणि इतर कलाकार होते. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील कॉन्सर्टमध्ये आतिफ असलम मंचावर गाणं गात असतानाच खाली उभ्या एका चाहत्याने त्याच्यावर नोटा उधळल्या. आतिफला सुरुवातीला काही समजलं नाही. पण हे पैसे आहेत लक्षात येताच त्याने मंचावरील इतर सह-कलाकारांना कॉन्सर्ट थांबवण्यास सांगितलं. यानंतर त्याने शांतपणे चाहत्याला, "माझ्या मित्रा, हे पैसे दान कर. माझ्यावर असे फेकू नको. हा पैशांचा अनादर आहे", असं समजावलं.


आतिफ असलम पैसे फेकणाऱ्याला मंचावर येऊन हे पैसे घेऊन जाण्यास सांगतो. तसंच तू फार श्रीमंत असशील, पण हा पैशाचा अनादर आहे असंही सुनावत हे पैसे दान करण्यास सांगतो. यादरम्यान प्रेक्षकही त्याच्या कृतीचं समर्थन करत टाळ्या वाजवतात. 



एक्सवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शेअर करणाऱ्याने लिहिलं आहे की, पैसे फेकण्याची परंपरा निर्माण करणाऱ्या या अशिक्षित पाकिस्तानींना त्याने किती शांतपणे विनंती करत चांगला संदेश दिला आहे. हा एकमेव पाकिस्तानी स्टार आहे ज्याचा अवलंब केला पाहिजे. 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नेटकरी त्यावर कमेंट्स करत आहेत. एका चांगल्या व्यक्तीला समोरच्याचा अनादर न करता त्याला धडा कसा शिकवावा हे चांगलं माहिती असतं अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, पैसे फेकणं, लग्नात ते तोंडातून दुसऱ्याला देणं हा किती अनादर आहे.