कॅन्सरग्रस्त चिमुकल्याचं स्वप्न साकार करणार ‘हा’ गायक
हा व्हिडिओ पाहून अनेकांचच मन हेलावून गेलं आहे.
मुंबई: कला, हे व्यक्त होण्याचं एक सुरेख माध्यम आहे हे आपण विविध उदाहरणांमधून पाहिलंच आहे. कलेच्या माध्यमातून यातना, दु:ख असे विविध भाव अगदी सहज व्यक्त करता येतात. कलेच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीकोनही मिळतो. गायक शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ पाहता याचीच प्रचिती येत आहे.
एका चिमुरड्या कलाकाराचा, गायकाचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांचच मन हेलावून गेलं आहे.
एका कॅन्सरग्रस्त मुलाचा हा व्हिडिओ असून, तो ‘गणनायकाय गणदैवताय...’ हे गाणं म्हणताना दिसत आहे.
‘त्याला पैसे, सहानुभूती असं काही नकोय. त्याला फक्त आपली कला, आपलं गाणं सादर करण्यासाठी एक व्यासपीठ हवं आहे’, असं महादेवन यांनी या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
केमोथेरेपिनंतर अवघ्या काही क्षणांनीच महादेवन यांनी त्या मुलाची भेट घेतली. आजाराशी झुंज देत असतानाही जीवनाकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाची त्यांनीही प्रशंसा केली. सूतच येत्या काळात त्याच्यासोबत गाणं रेकॉर्ड करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.