टिकटॉक सिया कक्करची `ही` इच्छा अर्धवटच राहिली
सियाने का घेतला टोकाचा निर्णय?
मुंबई : लोकप्रिय टिकटॉक स्टार सिया कक्कडने दिल्लीच्या गीता कॉलनीमध्ये राहत्या आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. बुधवारी रात्री सियाच्या आत्महत्या माहिती मिळाली. अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. सियाचे टिकटॉकवर ११ लाखाहून अधिक आणि इंस्टाग्रामवर जवळपास १ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. यावरूनच सियाच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण लावू शकतो.
काही दिवसांपासून सियाला सोशल मीडियावरून धमक्या मिळत होत्या. पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सियाचा मृतदेह कुटुंबियांना सोपविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आपल्या कुटुंबियांसोबत गीता कॉलनीत १३ व्या मजल्यावर राहत होती. कुटुंबियांमध्ये तिचे वडिल इंदर कक्कर, आई, बहिण आणि भाऊ आहे. सिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. (१६ वर्षीय Tiktok स्टार सिया कक्कडची आत्महत्या, चाहत्यांना धक्का)
गेल्या काही दिवसांपासून सिया सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ शेअर केले होते. हे व्हिडिओ ती टिकटॉकवरच नाही तर इंस्टाग्राम आणि यू-ट्यूबवर देखील शेअर करत होती. गेल्या काही काळात ती टिकटॉकमुळे मोठी स्टार बनली होती.
सियाचे आजोबा डेंटिस्ट होते. आजोबा त्या परिसरात लोकप्रिय होते. सिया देखील टिकटॉकमुळे लोकप्रिय झाली. लॉकडाऊनमध्ये तिने घरीच व्हिडिओ बनवणं पसंत केलं. त्यानंतर ती घराबाहेर पडून व्हिडिओ करू लागली होती.
सियाला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायचं होतं. पण नेमकं असं काय झालं? ज्यामुळे तिला इतक्या टोकाचं पाऊल उचलावं लागलं. पोलिसांसाठी देखील हे एक कोडं आहे. पोलिसांनी सियाचा लॅपटॉप, मोबाईल आणि इतर गोष्टी जप्त केल्या आहेत. यावरून तिच्या आत्महत्येचं कारण सापडतंय का? याचा तपास सुरू आहे..