मुंबई : CoronaVirus कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या घडीला संपूर्ण भारत आणि जवळपास अर्ध्याहून अधिक जगच लॉकडाऊन आहे. वैश्विक संटकाच्या रुपात समोर आलेल्या कोरोना विषाणूची लागण टाळण्यासाठी सर्वांनाच घरात राहण्याचं आणि परस्परांशी संपर्कात येताना सुरक्षित अंतर पाळण्याचं आवाहन सर्वच स्तरांवर करण्यात येत आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आठवड्याभरापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला. तत्पूर्वीच काही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या या काळात सतत धकाधकीचं आयुष्य जगणाऱ्यांपुढे काही आव्हानं आहेत. मुळात इतक्या दिवसांसाठी घरातच थांबणं हेत एक मोठं आवाहन. अर्थात जीवावर बेतलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनीच या पर्यायाला आपलंसं केलं आहे. आता या होम क्वारंटाईनच्या काळात तुम्हाला काही चुकल्यासारखं वाटत असल्यास, एका बॉलिवूड अभिनेत्याच्या 'हाऊस अरेस्ट'ची माहिती तुम्हाला असणंही तितकंच महत्त्वाचं. 


काही महिन्यांपूर्वीच त्याच्या जवळपास सहा महिन्यांच्या 'हाऊस अरेस्ट'ची कहाणी सर्वांसमोर आली. सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या संपर्कात राहत, घराच्या बाल्कनीतूनच बाहेरच्या जगाचं दर्शन घेत वेळ व्यतीत करणाऱ्या तुमच्याआमच्याप्रमाणेच या अभिनेत्यानेसुद्धा हा काळ व्यतीत केला होता. ज्याच्या 'हाऊस अरेस्ट'विषयी इथे चर्चा सुरु आहे तो म्हणजे अली फजल. 


'नेटफ्लिक्स'च्या 'हाऊस अरेस्ट' या वेब सीरिजच्या निमित्ताने अली फजलने फार दिवसांपूर्वीच होम क्वारंटाईन ही संकल्पना जवळून पाहिली होती हे आता काहीसं पटत आहे. मुळात असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण अलीने साकारलेला 'करण' हा एक बँकर तरुण त्याच्या आलिशान घरातून सहा महिन्यांसाठी अजिबातच बाहेर पडला नव्हता. पाहता पाहता, घरातच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी गुंतवून ठेवतात हे त्याच्या लक्षात आलं. घराची साफसफाई करण्यापासून, किराणा मागवण्यापर्यंतची सर्व कामं हा करण करत होता. 



'हाऊस अरेस्ट'च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं कथानक हे आजच्या दिवसांशी जोडलं असता त्यात काही अंशी साधर्म्य दिसतं. या आगळ्यावेगळ्या संकल्पनेविषयी आणि करणच्या अर्थात अली फजलच्या अनुभवाविषयी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिलाही माहिती होती. कारण, तिने यामध्ये अलीसोबत स्क्रीन शेअर केली होती. 



काही दिवसांपूर्वीच श्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या वेब सीरिजच्या चित्रकरणाच्या वेळीचा एक फोटो शेअर केला होता. हा काहीसा विचित्र योगायोग आहे, पण या वेब सीरिजच्या निमित्ताने होम क्वारंटाईन आणि लॉकडाऊनच्या काळाच मनोरंजनाचा हा घराच्या चौकटीतील नजराणा एकदा पाहावा असाच आहे.