Songya Movie : आपल्या समाजात अनेक प्रथा परंपरा आहेत, त्या जशा चांगल्या आहेत तशाच काही कुप्रथाही आहेतच. ज्या स्त्रियांवर अन्याय करतात केवळ अशिक्षित स्त्रिया नाही तर शिक्षित स्त्रिया ही त्यात भरडल्या जातात. मुलींची स्वप्न धुळीला मिळतात. अशाच एका कुप्रथेविरुद्ध उभी राहते एक तरुणी, तिचं प्रेम, तिची स्वप्न, इच्छा सर्व मोडून सुरु करते एक नवा संघर्ष. या संघर्षातून तिचं अपेक्षित ध्येय साध्य होतं का? या धीरोदत्त संघर्षाची कथा सांगणारा निरामि फिल्म्सची निर्मिती असलेला मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याआधी या चित्रपटाचं अत्यंत समर्पक पोस्टर आपल्या भेटीला येणार आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रूढी परंपरांच्या जोखडात अडकलेल्या स्त्री वेदनेचा वेध परखडपणे घेत त्यांच्या दृष्टीकोनातून समाजपरिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न ‘सोंग्या’ चित्रपटाच्या माध्यमातून केला असल्याचे दिग्दर्शक मिलिंद इनामदार सांगतात.दरम्यान, या चित्रपटात काय वेगळं पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. ज्या प्रकारे या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे ते पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. पोस्टरमध्ये एक चेहरा नसलेली स्त्री आणि तिच्या मागे काही पुरुष असून त्यांनाही चेहरा नाही आहे. खरं तर हे सगळे कार्टून आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


हेही वाचा : थलपती विजयच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' आणि 'जेलर'ला पछाडलं


‘सोंग्या’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या’ चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घुंगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.