सोनू निगमची टी-सीरिजच्या मालकाला धमकी
सोनूने शेअर केला व्हिडिओ
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक गुपित समोर आले आहेत. सिनसृष्टीतील ही गुपित त्याच इंडस्ट्रीशी जोडलेल्या लोकांमधून समोर येत आहेत. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये 'नेपोटिझम' आणि 'लोकांची लॉबी' यावर खूप चर्चा होत आहे.
या दरम्यान सोनू निगमने काही दिवसांपूर्वी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ही आत्महत्या होऊ शकते असं वक्तव्य करून सगळ्यांनाच धक्का दिला आहे. सोनू निगमच्या दुसऱ्या व्हिडिओत त्याने म्युझिक इंडस्ट्रीत लोकप्रिय असलेल्या टी-सीरिज कंपनीचे मालक भूषण कुमार यांच नाव घेतं धमकी दिली आहे. एवढंच नव्हे तर सोनू निगमने आपल्या या व्हिडिओत मॉडेल मरीना कंवरचं नाव घेत देखील धमकी दिली आहे. जर माझ्याशी पंगा घेतलात तर मी मरीनाचा व्हिडिओ यूट्यूबवर चॅनलवर शेअर करेन.
सोनू निगमने गुरूवारी आपला एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्याने संगीत क्षेत्रातील दोन मोठ्या कंपनींवर आरोप केला. या दोन कंपनींच्या निर्णयावरच संगीत क्षेत्रातील घडामोडी घडत आहेत. या दोन कंपनी माफियाच्या रूपात काम करत आहे. आता सोनूने नवीन व्हिडिओत म्हटलं आहे की, लातों के भूत बातों से नही मानते... मी कुणाचं नाव नाही घेतलेलं पण मी खूप साधेपणाने सांगितलं होतं की,नवीन लोकांशी तुम्ही चांगलेपणाने वागा. आत्महत्या होण्याअगोदरच आपण ही परिस्थिती बदलू म्हणजे आत्महत्या झाल्यावर रडण्याची वेळ येणार नाही.
पण शेवटी ते माफियाच आहेत. ते त्यांच काम करणारच. त्यांनी ६ लोकांना माझ्या विरोधात मुलाखत देण्यास सांगितलं. मी कुणाचच नाव घेतलं नाही पण आज लोकं माझं नावं घेऊन बोलतात. सोनूने पुढे म्हटलं की,'यामधील अनेक लोकं तर असे आहेत जे माझ्या अगदी जवळचे आहेत. गेल्या काही काळापासून हे लोकं माझ्याशी त्याच विषयांवर बोलत आहेत. पण आज त्यांना माझ्या विरोधात बोलावं लागत आहे. यामध्ये माझा एक सख्खा भाऊ आहे.'