`आपल्या बहिणींच्या...`; चंदीगड विद्यापीठ Video लीक प्रकरणावर सोनू सूदची मोठी प्रतिक्रिया
चंदीगड विद्यापीठातील धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विद्यार्थिनीला अटक केलीय
चंदीगढ : पंजाबच्या (Punjab) चंदीगड विद्यापीठातून (Chandigarh University) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीने 60 मुलींचा अंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट केलेत, जे सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोहालीच्या चंदीगड विद्यापीठात आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. 2 मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत विद्यार्थिनींनी चंदीगड विद्यापीठात (Chandigarh University) रात्री अडीचच्या सुमारास गोंधळ घातला. पोलिसांनी (Police) या प्रकरणी आरोपी विद्यार्थीनीला अटक केली आहे. याप्रकरणी खरार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या तरूणामार्फत हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक शिमल्याला (shimla) रवाना झाले आहे.
त्यानंतर आता बॉलिवूडमधूनही (bollywood) याप्रकरणी प्रतिक्रिया समोर येत आहेत. अभिनेता सोनू सूदने (sonu sood) ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सोनू सूदने हे अत्यंत दुर्दैवी प्रकरण असल्याचे म्हणत पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं आहे.
चंदीगड विद्यापीठात जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या बहिणींच्या पाठीशी उभे राहून जबाबदार समाजाचे उदाहरण घालून देण्याची वेळ आली आहे, असे सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत आवाहन करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप किंवा अन्य कोणत्याही माध्यमावर शेअर करू नका. अशा परिस्थितीत सोनू सूदनेही याकडे लक्ष वेधले. त्याने आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, 'हा आपल्यासाठी कसोटीचा काळ आहे, पीडितांसाठी नाही. जबाबदार रहा.'
नेमकं प्रकरण काय?
एका वसतिगृहातील विद्यार्थिनीने सुमारे 60 विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवून तिच्या ओळखीच्या शिमल्यात राहणाऱ्या एका मुलाला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. मुलाने कथितरित्या हा व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केला आहे. हॉस्टेल वॉर्डन आणि इतर मुलींनी आरोपी मुलीला विचारले असता तिने हा व्हिडिओ शिमल्यात राहणाऱ्या एका मुलाला पाठवल्याचे मान्य केले.