`बाहुबली` पाहून परदेशी प्रेक्षकांकडून थक्क करणारी प्रतिक्रिया
पाहा चित्रपट पाहून ते कसे व्यक्त झाले.....
मुंबई : एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' या चित्रपटाने प्रद्रर्शनानंतर संपूर्ण चित्रपट विश्वातील अनेक विक्रम मोडित काढले. काही नवे विक्रम प्रस्थापितही केले. अशा या चित्रपटाची वाहवा आताही सुरुच आहे. राजामौलींच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेल्या आणि कलाकारांच्या बहुविध कलांनी परिपूर्ण असणाऱ्या 'बाहुबली' चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतंच या चित्रपटाचं परदेशातही खास स्क्रीनिंग करण्यात आलं.
लंडन येथील 'द रॉयल अल्बर्ट हॉल'मध्ये 'बाहुबली- द बिगिनिंग'चं स्क्रिनिंग करण्यात आलं. ज्यानंतर तेथे उपस्थित प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ही थक्क करणारी होती. जवळपास १४८ वर्षांपूर्वी सुरु करण्य़ात आलेल्या 'द रॉयल अल्बर्ट हॉल'मध्ये दाखवण्यात आलेला 'बाहुबली' हा पहिला बिगर इंग्रजी चित्रपट ठरला आहे. मुख्य म्हणजे ही स्क्रीनिंग अतिशय खास होती, कारण एमएम किरावनी यांच्या पार्श्वसंगीताला फिलारमोनिक ऑर्केस्ट्रातून सादर करण्यात आलं होतं.
प्रेक्षकांनी तुडूंब भरलेल्या या भव्य सभागृहात चित्रपट संपल्यानंतर उपस्थितांनी उभं राहून सर्वच कलाकारांचं कौतुक केलं. यावेळी सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला. 'बाहुबली' या चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यानचे काही फोटो शेअर करण्यात आले होते. या खास क्षणाच्या निमित्ताने खुद्द दिग्दर्शक राजामौली, राणा डग्गुबती, प्रभास, अनुष्का शेट्टी यांचीही हजेरी होती.