राजगढ : बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या एका कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली. कार्यक्रम सुरू असतानाच प्रेक्षकांनी दगडफेक सुरू केली. या गोंधळामुळे सपना चौधरीला कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून जावे लागले. या चेंगराचेंगरीत काही लोक जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजगढ जिल्ह्यातील पचौरजवळ राम लखन गोर्डनमध्ये सपना चौधरीचा बुधवारी रात्री कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी प्रेक्षकांच्या गर्दीतून एकमेकांना धक्काबुक्की सुरू झाली. कार्यक्रमठिकाणी मोठी गर्दी झाल्याने लोकांना सपनाचा डान्य नीटसा दिसत नव्हता. त्यामुळे सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहिले. जागेवर उभे राहिल्याबद्दल पोलिसांनी गर्दीला तसे न करण्यास सांगितले. या कारणावरून प्रेक्षकांच्या तुफान गर्दीचा पोलीस आणि व्यवस्थापकांसोबत वाद सुरू झाला. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतप्त नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर सपना चौधरीला स्टेजवरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 



 



सपना चौधरीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी, आयोजकांनी तिकीटाच्या माध्यमातून लोकांकड़ून लाखो रूपये कमावून सपना चौधरीला बोलवले होते. परंतु कार्यक्रमस्थळी व्यवस्थापनाकडून योग्य ती व्यवस्था न केल्याने प्रेक्षकांकडून विरोध करण्यात आला. या विरोधानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे प्रेक्षकांनी सांगितले. या घटनेनंतर आयोजकांनी मोबाईल फोन बंद करून ते फरार असल्याचेही सांगितले आहे.