मुंबई : 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. ही चर्चा होण्यामागचं कारणंही तसं आहे. नव्या कल्पनांना वाव देत त्या कल्पना किंबहुना नवी स्वप्न साकार करण्याचं बळ सध्या हा कार्यक्रम सर्वांना देत आहे. अशा या कार्यक्रमानं सध्या एका शेतकऱ्याच्या मुलाला, युवा शेतकऱ्याला मोठी आर्थिक मदत केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगावचा कमलेश घुमरे हा 27 वर्षीय तरुण या कार्यक्रमात आला. त्यानं समोर पॅनलवर असणाऱ्या गुंतवणूकदारांना आपली संकल्पना समजावून सांगितली. 


किंबहुना कमलेशनं ही संकल्पना मोठ्या अनोख्या अंदाजात त्यांच्यापुढे मांडली. 


 'जुगाड़ू कमलेश' अशी आपली ओळख सांगताना मी एक शेतकरी आहे, असं तो अभिमानानं म्हणाला. आपला मोठा भाऊ सैन्यात तर आपण इथं धरणी मातेची सेवा करतोय असंही त्यानं सांगितलं. 


कमलेशचा खरेपणा इथे सर्व गुंतवणुकदारांच्या मनाला स्पर्शून गेला. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेलं नसतानाही त्यानं कल्पनाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर सात वर्षांची मेहनत घेत एक फवारणी यंत्र तयार केलं. 


सहसा शेतपिकावर फवारणी करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांच्या शरीरावरही याचे परिणाम दिसून येतात. आपल्या वडिलांनाही अशाच त्रासाशी झुंजताना त्यानं पाहिलं आणि तो कामाला लागला. 


ठराविक तासांची नोकरी न करता त्यानं आपल्या स्वप्नाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. कमलेशनं एक असं यंत्र साकारलं ज्यानं फवारणी करताना कमीत कमी त्रास आणि मेहनत लागणार आहे. 


यामध्ये सुरुवातीला त्याला बऱ्याच अडचणी आल्या, भंगारवाल्यांकडून टाकाऊ वस्तू गोळा करत त्यानं 8 हजार रुपयांच्या खर्चात हे यंत्र तयार केलं आणि तो या मंचापर्यंत येऊन पोहोचला. 


आपल्याला गुंतवणूक मिळाली नाही, तरी इथंवर येण्याचाच आनंद जास्त आहे असं तो मोठ्या मनानं म्हणाला. त्याचे हेच शब्द लेन्सकार्टचे सहसंस्थापक पियुष बन्सल यांना भावले. 


कमलेशच्या या संशोधनात्मक व्यवसायामध्ये त्यांनी 40 टक्के इक्विटीसाठी 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्याला 20 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देत असल्याचं जाहीर केलं. 


चला यालाही मोठं करु... असं म्हणत त्यांनी कमलेशच्या जिद्दीला सलाम केला. हे क्षण पाहताना एका शेतकऱ्याच्या मुलानं गाठलेली उंची अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. 



काय आहे शार्क टँक इंडिया? 
 (Shark Tank India) कार्यक्रम सध्या बराच गाजतोय. यामध्ये गुंतवणुकदारांचं एक पॅनल आहे. ज्यांना शार्क म्हणून संबोधण्यात येतं. 


या शार्क्ससमोर नवउद्योजक येतात आणि त्यांच्या कल्पना, उत्पादन वस्तू सादर करतात. ज्यांचं सादरीकरण, ज्यांची उत्पादनं या गुंतवणूकदारांना पटतात, त्यामध्ये ते मोठी रक्कम गुंतवतात. 


भारतीय टेलिव्हीजन विश्वात प्रसारित केला जाणारा हा कार्यक्रम आता नेमका किती आणि कोणत्या उद्योजकांच्या स्वप्नांना उडण्याचं बळ देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.