Oscars 2019 गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते ऑस्कर; स्नेहाचा अविश्वसनीय प्रवास
ऑस्कर पुरस्काराला कलाक्षेत्रात मोलाचे स्थान आहे. विशेष म्हणजे एका हिंदी लघु चित्रपटाला `डॉक्यूमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट` पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
मुंबई : ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये मोठ्या उत्साहात पार पाडला. ऑस्कर पुरस्काराला कलाक्षेत्रात मोलाचे स्थान आहे. विशेष म्हणजे एका हिंदी लघु चित्रपटाला 'डॉक्यूमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. भारताच्या ग्रामीण भागात मासिकपाळीच्या वेळी महिलांना होणारा त्रास त्याचप्रमाणे पॅडची अनुपलब्धता याविषयांवर आधारलेला 'पिरीयड एन्ड ऑफ सेंटेन्स' या लघु चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. लघु चित्रपटाचे दिग्दर्शन रायका जेहबाची यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती भारतीय निर्माते गुनीत मोंगा यांच्या 'सिखिया एंटरटेनमेंट' प्रोडक्शनखाली तयार करण्यात आला आहे. दिल्लीतील बाह्य भागातील 'हापुड' गावातील सत्य घटनेवर चित्रपटाची कथा बेतलेली आहे.
लघु चित्रपटाचे दिग्दर्शक रायका जेहबाची लघु चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या स्नेहा आणि तिच्या कुटुंबाचे कौतुक केले, हा चित्रपट‘ऑकवुड स्कूल इन लॉस एंजिलिस’चे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक मिलिसा बर्टन यांच्या द्वारा सुरू करण्यात आलेल्या 'द पॅड प्रोजेक्ट'चा भाग आहे. जेहबाची या ऑस्कर पुरस्कार स्वीकारत म्हणाल्या, 'मी माझे आश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मझा विश्वास बसत नाही की माझ्या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.'
त्याचप्रमाणे बर्टन यांनी त्यांच्या शाळेला हा पुरस्कार समर्पित करत म्हणाल्या, ' माझे लॉस एंजिलिसचे विद्यार्थी आणि भारत दोघे मिळून जनतेच्या विचारांमध्ये बदल करू इच्छूक असल्यामुळे या संक्लपनेचा जन्म झाला.' पूर्ण एक दशकानंतर भारताला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. २००९ साली एआर रेहमान आणि साउंड इंजीनियर रसूल पोकुट्टी ‘स्लमडॉग मिलेनियर’ सिनेमाला अकादमी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.