लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचं काम - सुबोध भावे
सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहून सुबोध भावे यांनी व्यक्त केली मनातील खदखद, वळल्या सर्वांच्याच नजरा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती राजकारणावर आपलं मत मांडत आहे. अशात अभिनेते सुबोध भावे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 'लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचं काम दिलाय.' असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकारणावर मनातील खदखद व्यक्त केली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसमोर सुबोध भावे बोलले.
यावेळी सुबोध भावे यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीवर देखील आपलं मत मांडलं, 'आपण प्रत्येक जण उत्तम शिक्षण घेतो करियरच्या मागे लागतो. चांगली नोकरी कशी मिळेल या प्रयत्नात असतो. परदेशात जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत '
पुढे सुबोध भावे म्हणाले, 'अशा विचारांमुळे लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचं काम दिलाय. म्हणून देश निर्मितासाठी पुढच्या पिढीमध्ये शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल. राजकारण्यांच्या हातात देश देऊन काही होणार नाही. ते काय करतील हे चित्र आपल्या समोर आहे.' असं म्हणत सुबोध यांनी सध्या राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
राजकारणावर नाराजी व्यक्त करत सुबोध भावे म्हणाले, 'पुढच्या पिठीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्यांना देशासाठी उभे करणे आवश्यक आहे. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावे यासाठी देशार शिक्षण व्यवस्था आणली. आपण तीच व्यवस्था पाळत आहो. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रातून निघून गेले तर पैसेच राहणार नाहीत.. अशी वक्तव्ये करण्यास काही राजकारणी धजावतात...’
नोकरदार वर्गाचा मुद्दा मांडत सुबोध भावे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. 'आता आपण मुलांना हिंदी आणि मराठी गाण्यांवर नाचायला शिकवतो. सिनेमांमधील डायलॉग बोलायला लावतो, असं करून देश घडणार नाही. याऐवजी जर मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले, तर त्यांच्यात देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल' असा विश्वास देखील सुबोध भावे यांनी यावेळी व्यक्त केला.