मुंबई : एक काळ असा होता की, सुचित्रा सेन बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अभिनेत्री मानल्या जायच्या. सुचित्रा यांनी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना आर्कषित केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर चित्रपटांमध्ये करिअरची सुरुवात करणार्‍या सुचित्रा यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. सुचित्रा सेन यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ साली बांगलादेशमध्ये झाला होता. सुचित्रा सेन यांचं खरं नाव रोमा दासगुप्ता होतं. सुचित्रा सेन यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. आपल्या अभिनयातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुचित्रा सेन यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर कोट्यावधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं. सुचित्रा सेन एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त त्या एक स्वाभिमानी व्यक्ति असल्याचंही म्हटलं जात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सुचित्रा सेन यांचे वडील, पाबना महानगरपालिकेत स्वच्छता अधिकारी या पदावर होते. त्यांची आई हाऊसवाईफ होत्या. तर त्यांचे आजोबा रजनीकांत सेन हे एक प्रसिद्ध कवी होते. 1947 मध्ये झालेल्या फाळणीच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. श्रीमंत उद्योगपती आदिनाथ सेन यांचा मुलगा दिबानाथ सेन यांच्याशी त्यांचं लग्न अवघ्या 15 वर्षी झालं.


सुचित्रा सेन यांना लहानपणापासूनच कलेची फार आवड होती. शाळेच्या दिवसांतही त्या नाटकांमध्ये भाग घ्यायच्या. आजोबा कवी असल्याने सुचित्रा यांनीही त्यांच्याकडून खूप मदत मिळाली. मात्र, त्यांच्या फिल्मी कारकीर्दीला फारशी चांगली सुरुवात झाली नव्हती. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बंगाली चित्रपटांमधून केली. त्यांनी 'शेष कोथाय' या बंगाली चित्रपटातून सिनेसृष्टीत एट्री घेतली. दुर्दैवाने, हा चित्रपट कधीही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही.


सुचित्रा सेन यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात विमल रॉय यांच्या 'देवदास' या चित्रपटामधून केली होती. 1955 मध्ये, त्या चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसल्या. प्रेक्षकांनी त्यांच्या 'पारो' या भूमिकेला चांगलीच पसंती दिली.  


सुचित्रा सेन यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सुचित्रा सेन यांनी त्यांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीत फक्त सात हिंदी चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. देवदास नंतर त्यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट 'आंधी' हा होता . या चित्रपटात त्यांनी जी व्यक्तिरेखा साकारली होती. ती भूमिका भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्याशी जुळणारी होती


सुचित्रा यांनी बड्या चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याची ऑफर नाकारली. सुचित्रा यांनी राज कपूर यांचा प्रस्ताव यासाठी फेटाळून लावला होता. कारण राज कपूर यांची त्यांना फूल देवून कनव्हेंन्स करण्याची पद्धत त्यांना आवडली नव्हती. इतकंच नव्हे तर त्यांनी 2005 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराचा प्रस्तावही फेटाळून लावला.


सुचित्रा सेन यांची कारकीर्द खूप चांगली चालली होती. पण जेव्हा त्यांचा 'प्रोनॉय पाशा' हा चित्रपट फ्लॉप ठरला तेव्हा त्यांना धक्का बसला. त्याच वेळी चित्रपटसृष्टीला त्यांनी निरोप देण्याचं मनापासून ठरवलं होतं. यामुळेच त्यांनी राजेश खन्नासोबतचा 'नटी विनोदिनी'


 हा चित्रपट अर्ध्यातच सोडला. नंतर हा चित्रपटही बनला नाही. 1978 साली सुचित्रा सेन चित्रपटसृष्टीतून गायब झाल्या. फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिल्यानंतर सुचित्रा सेन यांना 2005 साली दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.


पुरस्कार सोहळ्यात सुचित्रा पोहचल्याच नाही. त्या म्हणाल्या, 'मला पुन्हा लाइमलाइटमध्ये यायचे नाही'. "तुम्हाला हा पुरस्कार मला द्यायचा असेल तर घरी येऊन द्या." सुचित्रा यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिलाच गेला नाही.  


सुचित्रा सेन यांचं निधन झालं त्यावेळी त्या 82 वर्षांच्या होत्या. 24 डिसेंबर 2013 रोजी फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चालू उपचारादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या जवळजवळ बऱ्याही होत होत्या. मात्र 17 जानेवारी 2014ला  अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाला निरोप दिला.