बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गदर चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले असून, सुपरहिट होण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. दरम्यान, सनी देओल सध्या चित्रपटासह आपल्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आहे. याचं कारण गदर चित्रपटामुळे बॉलिवूडला याआधी कधीही पाहिलं नाही ते चित्र पाहायला मिळालं आहे. ते म्हणजे सनी देओलने जाहीरपणे आपल्या सावत्र बहिणी ईशा देओल आणि अहाना देओल यांच्यासह फोटो काढले. इतकंच नाही तर यावेळी त्याने मिठी मारत आपलं बहिणप्रेमही दाखवून दिलं. सावत्र भावा बहिणीतील हे प्रेम पाहून एकीकडे अनेकांना आश्चर्य वाटलं, तर काहींना कौतुक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत गदर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला सनी देओलच्या सावत्र बहिणी ईशा देओल आणि अहाना देओल यांनीही हजेरी लावली. यावेळी ईशा आणि अहाना यांची मुलंही सोबत होती. ईशा आणि अहाना स्क्रिनिंगसाठी पोहोचल्यानंतर स्वत: सनी देओलने त्यांचं स्वागत केलं. यावेळी सनी देओलसह त्याचा भाऊ बॉबी देओलही उपस्थित होता. बॉबी देओलनेही आपल्या सावत्र बहिणींची गळाभेट घेतली. 


देओल कुटुंबाचं हे मिलन पाहणं अनेकांसाठी पर्वणीच होतं. त्यामुळेच या भेटीचे फोटो आणि व्हिडीओही काही क्षणात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. सनी देओल आणि बॉबी देओल याआधी कधीच जाहीरपणे आपल्या सावत्र बहिणींसोबत एकत्र दिसले नसल्याने फोटो आणि व्हिडीओ चर्चेत होते. 


धर्मेंद झाले भावूक


आपली मुलं एकत्र आल्यानंतर वडील धर्मेंद्र भावूक झाले होते. धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सनी देओल, बॉबी देओल, ईशा आणि अहाना यांचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत बॅकग्राऊंडला भावा बहिणीचं नातं दर्शवणारं 'वतन के रखवाले' चित्रपटातील गाणं 'माता भी तू पिता भी तू' वाजत होतं. हा व्हिडीओ पाहून धर्मेंद्रही भावूक झाले. 


सनी देओलच्या मुलाच्या लग्नात न बोलावल्याने धर्मेंद्र यांनी मागितली होती माफी


सनी देओल आणि बॉबी देओल हे धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची मुलं आहेत. सनी आणि बॉबी यांना अजिता आणि विजेता या दोन बहिणीही आहेत. तर हेमा मालिनीसोबत प्रेमविवाह केल्यानंतर धर्मेंद्र यांना ईशा आणि आहाना दोन मुली झाल्या. धर्मेंद्र यांनी मुस्लीम धर्म स्वीकारून आपल्या दोन्ही पत्नींना स्विकारलं आणि दोन वेगवेगळ्या घऱात संसार केले. यामुळे धर्मेंद्र यांची दोन्ही कुटुंब नेहमीच एकमेकांपासून वेगळी राहिली.


धर्मेंद्र यांची मुलंही फार एकत्र दिसली नव्हती. त्यातच सनी देओलचा मुलगा करणचं लग्न झालं तेव्हाही हेमा मालिनी, ईशा देओल अनुपस्थित होत्या. यानंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांची माफी मागितली होती. यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. पण आता गदर चित्रपटामुळे देअओल कुटुंब जवळ येताना दिसत आहे.