`जवान` बॉक्स ऑफिसवर `गदर` करत असतानाच सनी देओलचं शाहरुखबद्दल मोठं विधान, म्हणाला `बालिशपणा...`
बॉलिवूड बादशाह शाहरुख खान सध्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं असून, सनी देओलच्या `गदर 2` चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. यादरम्यान सनी देओलने शाहरुख खानसोबतच्या आपल्या जुन्या भांडणावर भाष्य केलं आहे.
बॉलिवूड बादशाह शाहरुख खान सध्या 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली असून, 'गदर 2' चे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जवान आणि गदरच्या निमित्ताने शाहरुख खान आणि सनी देओल पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. याआधी डर चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर दोघांनी बोलणंच बंद केलं होतं. दोघांमधील हे भांडण बॉलिवूडमध्ये आजही चर्चेचा विषय आहे. पण 'गदर 2' नंतर या दोन्ही अभिनेत्यांनी आपापसतील भांडण मिटवलं आहे. शाहरुख खाननेही 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीत हजेरी लावत आपणही या भांडणाला पूर्णविराम दिला असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, सनी देओलने नुकतंच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानसह झालेल्या भांडणावर भाष्य केलं आहे.
सनी देओलने इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, शाहरुख खाने आपल्या संपूर्ण कुटुंबासह 'गदर 2' चित्रपट पाहिला असल्याचं सांगितलं. तसंच शाहरुख खानसोबतच्या सध्याच्या आपल्या मैत्रीवर भाष्य करताना सांगितलं की "ज्यावेळी हे सगळं घडलं तेव्हा वेगळा जमाना होता. आता लोक त्यावेळी काय झालं हे विसरतात असं मी म्हणू शकतो. या गोष्टी व्हायला नको होत्या हेदेखील खरं आहे. तो बालिशपणा होता".
'जवान' की 'गदर 2'; तीन दिवसांतच झाली पोलखोल; कमाईचे खरे आकडे आले समोर
"यानंतर शाहरुख खान आणि मी अनेकदा भेटलो. आम्ही अनेक विषयांवर एकमेकांशी बोलतो. आम्ही काही चित्रपटांवरही गप्पा मारल्या होत्या. यावेळी त्याने संपूर्ण कुटुंबासह माझा चित्रपट पाहिला. यानंतर त्याने मला फोनही केला होता. आता आमच्यात सर्व काही ठीक आहे," असं सनी देओलने सांगितलं आहे.
'गदर 2' आणि 'जवान'मुळे बॉलिवूडला अच्छे दिन
सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या गदरचा हा सिक्वेल आहे. गदर 2 हा बॉलिवूडच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.
दुसरीकडे शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं आहे. चित्रपटाला 75 कोटींची रेकॉर्डब्रेक ओपनिंग मिळाली होती. शुक्रवारी मात्र चित्रपटाच्या कमाईत थोडी घट दिसली होती. शुक्रवारी चित्रपटाने 53 कोटी कमावले होते. पण शनिवारी चित्रपटाने पुन्हा एकदा झेप घेतली आणि 78 कोटी कमावले. रविवारच्या ऐतिहासिक कमाईनंतर फक्त 4 दिवसांत चित्रपटाने देशात 285 कोटींचा आकडा पार केला आहे.
जवान फक्त देशभरात नाही तर आंततरराष्ट्रीय बाजारपेठेतही जोरदार कमाई करत आहे. फक्त 3 दिवसांत जवानने 300 कोटींचा आकडा पार केला होता. जगभरात चित्रपटाने 384 कोटी कमावले होते.