तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. राज्यात आलेला पूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. या पुरात सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेंच नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे सुमारे १० हजार किलोमीटरचे रस्ते आणि सुमारे २०० पूल जमीनदोस्त झाले आहेत. ७ लाखांहून अधिक लोकं बेघर आहेत. अजूनही अनेक गावं संपर्कहिन आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातच केरळला विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. अनेक राज्यांनी केरळला मदतीचा हात दिला आहे. यातच अभिनेत्री सनी लिऑनने देखील केरळला मोठी मदत केल्याची चर्चा सध्या रंगत आहे. सनी लिओनने केरळमधील पूरग्रस्तांना ५ कोटी रुपयांची देणगी दिली असल्य़ाची सोशल मीडियावर चर्चा आहे. केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही रक्‍कम सनीने दिल्याची चर्चा होत आहे. परंतु, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सनी लिऑन किंवा तिच्या मॅनेजरकडून मिळालेली नाही.


सनी लिऑनचं केरळच्या प्रति असलेलं प्रेम तिने अनेकदा शेअर केलं आहे. एक वर्षापूर्वी जेव्हा सनी लिऑन केरळला गेली होती तेव्हा तिला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सनीच्या कारला पुढे जायला देखील मार्ग नव्हता. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला होता.


केरळमधली पूरस्थिती आता काहीशी सुधारली आहे. पण पाणी उतरल्यानं आता त्यामुळे झालेल्या जीवित आणि वित्त हानीचं भीषण वास्तवही आता समोर आलं आहे. ११ हजार गावं उद्धवस्त झाली आहेत. २६ लाख घरांना अजूनही वीजपुरवठा सुरू झालेला नाही. ४६ हजार हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. काल दिवसभरात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या सहा दिवसातील मृतांचा आकडा २५२वर पोहचला आहे. गेल्या तीन महिन्यात सुमारे साडे चारशे जणांनी पावसामुळे प्राण गमावले आहेत.