मुंबई: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला त्याचा मित्र संदीप सिंह याचे भाजपशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी प्रसारित केली होती. यामध्ये संदीप सिंह याने सुशांतच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेते संजय निरूपम यांना तीनदा फोन केल्याचे म्हटले आहे. तर १ डिसेंबर ते २३ डिसेंबर या काळात भाजपच्या कार्यालयात तब्बल ५३ वेळा फोन केला होता. याशिवाय, संदीप सिंह लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावाही या इंग्रजी वृत्तवाहिनीने केला आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटच्या संदर्भात सीबीआय संदीप सिंहची चौकशी करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SSR case: संदीप सिंह यांच्यासोबतच्या 'त्या' फोटोवर फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

याच माहितीच्याआधारे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. संदीप सिंह याने भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन केला. यावेळी तो कोणाशी बोलत होता? भाजपमधील संदीप सिंहचा हँडलर कोण आहे, असे सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केले. यापूर्वी सचिन सावंत यांनी संदीप सिंहचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा त्यांचा फोटो ट्वीट केला होता. संदीप सिंह हा बॉलिवूडमधील एक निर्माता असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवला होता. त्यामुळे भाजपशी असलेल्या त्याच्या संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांनी केली होती. 



सचिन सावंत यांच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा अभ्यास कमी पडत आहे. संदीप सिंह हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वर जो सिनेमा झाला त्याचेही निर्माते होते. एखाद्या कार्यक्रमात माझा त्यांच्या सोबत फोटो असेल तर काही फरक पडत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते.