सुशांतसिंहप्रकरणी `नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो`कडूनही गुन्हा दाखल
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी आता एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी आता एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सध्या सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे, त्यातच आता ड्रग्जचं प्रकरण समोर आल्यामुळे एनसीबीनेही यात उडी घेतली आहे.
रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सऍप चॅट समोर आल्यामुळे या प्रकरणात ड्रग्जचा संशय समोर आला आहे. या व्हॉट्सऍप चॅटमध्ये ड्रग्जबाबत बोलणी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिया ज्या मिरांडा सुशीसोबत चॅटिंग करत होती, तो दुसरा-तिसरा कोणी नसून सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा असल्याचं समोर येत आहे.
समोर आलेल्या या WhatsApp chatमध्ये रिया गौरवला एमडी म्हणजेच Methylenedioxymethamphetamine या अतिशय स्ट्राँग ड्रगविषयी विचारताना दिसत आहे. 'आपण स्ट्राँग ड्रग्जविषयी सांगावं तर, मी कधी त्यांचा वापर केलेला नाही', असं रियाचं २०१७ मधील बोलणं समोर आलं आहे. एमडीबाबत तुला काही ठाऊक आहे का, असंही तिनं विचारल्याचं कळत आहे.
जया साहा नावाच्या एका व्यक्तीशीही ड्रग्जबाबत रियाचं बोलणं झाल्याचं उघड झालं आहे. ही व्यक्ती रियाच्या मित्रमंडळींपैकी एक असल्याचं म्हटलं जात आहे. २०२० च्या एप्रिल महिन्यास सॅम्युअल मिरांडा आणि रियामध्ये झालेलं बोलणंही अनेक मुद्द्यांना वाचा फोडत आहे.
'रिया स्टफ बऱ्याच अंशी संपला आहे', असं तो रियाला सांगत असल्याचं हा चॅट वाचून कळतं. इतकंच नव्हे, तर 'आपण शौविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का? पण त्याच्याकडे फक्त हॅश आणि बड आहे', असं बोलणंही समोर आलं आहे. शौविक हा रियाचा भाऊ आहे. ज्याच्याबद्दलही सॅम्युअल आणि रियामध्ये बोलणं झालं होतं.