मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ड्रग्सबाबत गौरव आर्यासोबतचं रियाचं बोलणं व्हायरल झाल्यामुळे SSR Caseला एक वेगळं वळण मिळालं असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याचीही चौकशी होणार आहे. त्यासाठी गौरव आर्या मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. गौरव आर्या दुपारी 3 च्या फ्लाईटने मुंबईकडे रवाना होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजुनामधील हॉटेल टॉमरँडमधून गौरव आर्या मुंबईकडे यायला निघाला आहे. गौरव आर्याला ईडीने समन्स बजावला होता. सोमवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्याला मुंबईमधील ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.


अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या व्हाट्सएप चॅटमध्ये गौरव आर्याचा उल्लेख होता. रिया चक्रवर्तीने गौरव आर्याकडे ड्रग्सबाबत चौकशी केली असल्याचं चॅट आहे. त्याचबरोबर अनेक वेळा रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्यामध्ये संभाषण झाल्याचंही समोर आलं आहे. या संभाषणामध्ये  आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा ईडीला संशय आहे.


दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरण सीबीआयच्या ताब्यात देऊन आज जवळपास 10 दिवस होत असून, गेल्या 10 दिवसांत सीबीआयकडून सतत संबंधितांचं चौकशी सत्र सुरु आहे. सुशांत प्रकरणात सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीपुढील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही रियाची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. सीबीआयकडून चौकशीदरम्यान विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर देताना रिया गोंधळून गेल्याची माहिती आहे.