पहिलाच चित्रपट आणि सुषमाजींची भेट...रितेशनं जागवल्या आठवणी
सुषमा स्वराज यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण रितेशने सांगितली आहे.
मुंबई : भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सुषमा यांच्या निधनावर दुख: व्यक्त केलं. सुभाष घई, रवीना टंडन, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, रितेश देशमुख अशा अनेक कलाकारांनी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. रितेश देशमुखने एक पोस्ट शेअर करत, सुषमा स्वराज यांच्याशी झालेल्या एका भेटीची आठवण सांगितली आहे.
रितेश देशमुखने ट्विट करत, २००१ मध्ये सुषमा स्वराज रामोजी फिल्म सिटीमध्ये आल्या असता यांची भेट झाल्याचं सांगितलं. त्यावेळी रामोजी फिल्म सिटीमध्ये रितेश आणि जेनेलिया त्यांच्या पदार्पणातील पहिल्याच 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाचं शूटिंग करत होते.
चित्रपटाच्या सेटवर आल्यानंतर त्यांनी आम्हाला आशिर्वाद देत, आमच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी आम्ही या क्षेत्रात अतिशय नवीन होतो. त्यांनी आम्हाला याबाबत प्रोत्साहनही दिलं असल्याचं रितेशने म्हटलंय. याबद्दल रितेशने सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.
रितेशने सुषमा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत शोक व्यक्त केला.
मंगळवारी रात्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांचं किडनी ट्रांसप्लांटही झालं होतं. शारिरीक अस्वास्थ्यामुळे त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूका लढवण्यास नकार दिला होता. २०१४ मध्ये सुषमा यांच्यावर परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती त्यांनी अतिशय लिलया पार पाडली.