स्वप्नील जोशीचा `मी पण सचिन` अवतार
सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर ! क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.
मुंबई : सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर ! क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.
भारताच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील, कि ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे. अश्या या सर्व होतकरू तरुणांचे नेतृत्व करणारा सिनेमा लवकरच मराठीच्या मोठ्या पडद्यावर येत आहे.
'मी पण सचिन' असे या सिनेमाचे नाव असून, नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर फर्स्ट लुकसह मुहूर्त करण्यात आला. गणराज असोसिएटसने आतापर्यंत प्रस्तुत आणि निर्मित केलेल्या हिट चित्रपटांच्या यादीत आता लवकरच 'मी पण सचिन' या चित्रपटाचा देखील समावेश होत आहे. विशेष म्हणजे, मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव यात लेखक आणि दिग्दर्शक अश्या दुहेरी भूमिकेतून लोकांसमोर येत आहे.
या सिनेमात मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी झळकणार असून, सिनेमाच्या फर्स्ट लुकमध्येदेखील तो दिसून येतो. क्रिकेटरच्या पेहरावात एक लहान खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे, हा सिनेमा भविष्यात सचिन होऊ इच्छिणाऱ्या एका महत्वाकांक्षी क्रिकेटपटूवर आधारित आहे का? असा प्रश्न पडतो. शिवाय स्वप्नील जोशीची यात नेमकी कोणती भूमिका आहे, हे देखील गुपित यात आहे. गणेश गीते व नीता जाधव यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणाची पुणे येथे सुरुवात झाली असून, हा सिनेमा भारतातील क्रिकेटवेड्या तरुणाईंचे भावविश्व मांडणारा ठरेल अशी आशा आहे.