स्वरा भास्कर `या` ट्विटमुळे पुन्हा चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आलीये. स्वराने न्यू इंडिया आणि इंग्रजी चॅनेलविरोधात ट्विटद्वारे आपला राग व्यक्त केलाय.केरळमधील लव्ह जिहादशी संबंधित या प्रकरणावर स्वराने ट्विट केलेय. या ट्विटवरुन ती सोशल मीडियावर ट्रेंड होतेय.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आलीये. स्वराने न्यू इंडिया आणि इंग्रजी चॅनेलविरोधात ट्विटद्वारे आपला राग व्यक्त केलाय.केरळमधील लव्ह जिहादशी संबंधित या प्रकरणावर स्वराने ट्विट केलेय. या ट्विटवरुन ती सोशल मीडियावर ट्रेंड होतेय.
'न्यू इंडियामध्ये हिंदू मुलगी मुस्लिम तरुणावर प्रेम करु शकत नाही. अन्यथा टीव्हीवाले त्याचं स्टिंग ऑपरेशन करुन ते लव्ह जिहाद असल्याचे सिद्ध करतील आणि लोक त्यावर विश्वास ठेवतील', असं स्वराने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
स्वराच्या या ट्विटवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. काहींनी स्वराच्या ट्विटला संमती दर्शवलीये. आता या देशात कोणी कोणावर प्रेम करावे हे इतर लोक ठरवणार का? असा सवाल स्वराच्या ट्विटला संमती दर्शवणाऱ्यांनी उपस्थित केलाय.दरम्यान, काहींनी स्वराच्या मताला विरोध केलाय.
काय आहे प्रकरण
केरळमधील शफीन जहान याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात एका हिंदू मुलीशी विवाह केला होता. लग्नानंतर या तरूणीने इस्लाम धर्म स्वीकारला. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे सांगत हा विवाह नामंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेलाएनआयए) तपासाचे आदेश दिलेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या नेतृत्वाखालील एनआयएचं पथक हा तपास करणार आहे.