तमिळ चित्रपटसृष्टीत पुरुष अभिनेत्यांचंही होतं लैंगिक शोषण, स्वत: अभिनेत्रीने केला गौफ्यस्फोट!
अभिनेत्री सनम शेट्टीने गंभीर आरोप केले आहेत. मल्याळम सिनेमातील महिलांच्या शोषणाबाबत न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, तमिळ उद्योगातही स्त्री आणि पुरुष दोघांचेही लैंगिक शोषण होते.
Sanam Shetty : न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींची अवस्था वाईट असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तिथे महिलांचे लैंगिक शोषण शिगेला गेले आहे. जिथे मल्याळम चित्रपटांनी आपल्याला मोहनलाल, मामूट्टी, दुल्कर सलमान आणि फहाद फासिलसारखे स्टार दिले आहेत. त्याच इंडस्ट्रीवर अहवालात गंभीर आरोप आहेत. तिथल्या ज्युनियर आर्टिस्ट आणि क्रू मेंबर्सची अवस्था प्राण्यांपेक्षा खूपच वाईट असल्याचंही त्यात म्हटलं आहे.
मंगळवारी, अभिनेत्री चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालावर आपली प्रतिक्रिया देत होती. तमिळ चित्रपटसृष्टीत केवळ महिलाच नाही तर पुरुषांचेही लैंगिक शोषण होत असल्याचा खळबळजनक दावा तिने यावेळी केला.
सनमने मानले सरकारचे आभार
सनम शेट्टीने कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या विरोधात रॅली काढण्यासाची परवानगी मिळावी यासाठी तिने पोलीस आयुक्तांकडे संपर्क साधला होता. तेथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ती म्हणाली की, 'हेमा समितीच्या अहवालातील तपशील मला माहित नाही. पण मी या पावलाचे स्वागत करते. असा अहवाल आणल्याबद्दल आणि मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या शोषणाच्या सर्व समस्यांची यादी केल्याबद्दल मी न्यायाधीश आणि केरळ सरकारचे आभार मानू इच्छिते' असं ती म्हणाली.
तडजोड करु नका, तुम्हाला काम मिळेल
सनम शेट्टी पुढे म्हणाली की, तमिळ सिनेमाच्या जगातही अशा घटना घडत आहेत. कोणीही नाकारू शकत नाही. मी माझ्या अनुभवावरून बोलत आहे. मी या धोकादायक आणि क्रूर परिस्थितीच्या विरोधात आवाज उठवत आहे की काम मिळवण्यासाठी तडजोड हा एकमेव मार्ग नाही. मी माझ्या वैयक्तिक अभुभवावरून सांगते, कामासाठी हताश होऊ नका. स्वत:वर विश्वास असेल तर तडजोड न करता काम मिळेल. तर, थांबा.
इंडस्ट्रीत सगळेच वाईट नसतात
सनम शेट्टी म्हणाली की, इंडस्ट्रीत सगळेच वाईट नसतात. इंडस्ट्रीत महिलांसोबत पुरुषांनाही लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे त्यांनीच आवाज उठवावा अशी तिची इच्छा आहे. यासाठी खूप हिंमत लागते. पण कृपया पुढे या आणि अशा लोकांचा पर्दाफाश करा. असे सनम म्हणाली.