मुंबई: नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू असल्याची जळजळीत टीका अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केली आहे. काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. १७ जानेवारी रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर तनुश्री दत्ता हिने मंगळवारी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी तिने नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर आणि पोलिसांवर गंभीर दोषारोप केले. निलेश पावसकर यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला फसवून या प्रकरणातील पुरावेही नष्ट केले. पावसकर यांनी २००५ पासून नाना पाटेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या लैंगिक शोषणाची प्रकरणे रद्द केली. 


तसेच नाना पाटेकर आणि मनसेचे काय संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. नाना पाटेकर यांनी त्यावेळी मनसेच्या गुंडांना बोलवून सेटवर गोंधळ घातला. त्यानंतर गणेश आचार्यने माझे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही यावेळी तनुश्री दत्ताने केला. तनुश्रीने या प्रकरणातील पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेवरही बोट ठेवले आहे. पोलिसांनी अनेक पुराव्यांशी छेडछाड केल्याचे तिचे म्हणणे आहे. 


एवढेच नव्हे तर तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले. नाम फाऊंडेशनने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने परदेशातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या घेतल्या. मात्र, हा सर्व पैसा कुठे जातो? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटून फोटो काढायचे की यांचे काम झाले. ते कोल्हापूर पूरग्रस्तांना ५०० घरे देणार होते, त्याचे काय झाले?, असा सवालही यावेळी तनुश्री दत्ताने उपस्थित केला.